गड-किल्ल्यांच्या यादीत नव्याने ‘रामगड’ किल्ला

गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी घेतला शाेध
गड-किल्ल्यांच्या यादीत नव्याने ‘रामगड’ किल्ला

नाशिक |Nashik

नाशिकमधील गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेतील अप्रकाशित ‘रामगड’ किल्ल्याचा शोध घेतला आहे.

धुळे तालुक्यातील सडगाव येथे असणारा रामगड हा केवळ धार्मिक डोंगर नसून तो एक गिरीदुर्ग आहे, हे शोधमोहिम घेऊन प्रकाशात आणले आहे. काही वर्षांपूर्वी लळींग किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याच पर्वतरांगेत एक धार्मिक डोंगर असून त्यावर पाणी आहे, अशी जुजबी माहिती स्थानिकांकडून मिळाली होती.

त्यानंतर कुलथे यांनी नकाशे, प्रत्यक्ष भेट आणि अधिक अभ्यास करून या डोंगराचे नाव रामगड असून हा किल्ला असल्याचे निदर्शनास आणून देत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या यादीमध्ये एका किल्ल्याची भर घातली आहे.

रामगडाचे भौगोलिक स्थान 20.795850 N, 74.647155 E असे आहे. धुळे शहराला लागून असलेल्या लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ कि.मी. अंतरावर असलेले सडगाव किंवा हेंकळवाडी ही रामगड किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण – दहिदी – अंजनाळे – सडगाव असा देखिल मार्ग आहे.

रामगडाच्या खालच्या टप्प्यावर तसेच गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पीराचे स्थान आहे. तीन खडक खोदीव पाण्याची टाकी आहेत. पैकी दक्षिणेकडे १६ फूट लांब आणि १६ रूंद असे भले मोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. उत्तरेकडे दुसरे पाण्याचे खोदीव टाके आहे. त्यातील पाणी पिण्याजोगे आहे.

गडमाथ्यावरील पश्चिम दिशेला पाण्याचे तिसरे खोदीव टाके आहे. परंतु हे टाके सहजपणे दृष्टीस येत नाही. हे टाके अतिशय तीव्र उतारावर खोदलेले असून टाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि टाक्यातील पाणी काढण्यासाठी सावधानतेने हालचाली कराव्या लागतात. उत्तरेकडे गडमाथ्याच्या सर्वोच्च बिंदूवर दगड रचलेले प्रमुख जोते आढळते. या जोत्यात एका पीरबाबाचे स्थान आहे.

गडमाथा आणि परिसरात आपट्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. रामगडावर असणारे प्राचीन पाण्याची खोदीव टाकी, माथ्यावरील ज्याेती यावरून हा एक किल्ला आहे असे दिसून येते. लळिंग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम पसरलेली आहे. लळिंग रांगेच्या पूर्व टोकावर लळिंग किल्ला आहे तर पश्चिम टोकावर रामगड आहे.

रामगडाचे स्थान लक्षात घेतले तर तो बरोबर लळिंग किल्ला आणि गाळणा किल्ला यांच्या मध्यभागी आहे. रामगडापासून सरळ रेषेत अंतर मोजले तर लळिंग १० कि.मी. तर गाळणा १२ कि.मी. अंतरावर आहे. रामगडाच्या माथ्यावरून कुठल्याही अडथळ्याविना लळिंग आणि गाळणा दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे हे या दोन्ही किल्ल्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठीचे चौकीचे ठिकाणी असावे.

तसेच रामगडावरून दोन्ही किल्ल्यांवरील संदेश देणे/पोहोचविण्याचे कामही होत असावे असा कयास आहे. रामगडावरील पाण्याची साठवणूक आणि गडमाथ्याचा परिघ याचा अंदाज घेतला तर अगदी जुजबी शिबंदी येथे असावी. ती देखिल फक्त पहारा देणे, चौकी म्हणून वापर करणे यासाठी होती.

टेहळणीसीठी किल्ला?

रामगड हा गिरीदुर्ग असण्याला नाशिकमधिल प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि गिर्यारोहक गिरीश टकले यांनी दुजोरा दिला आहे. फारूखी सुल्तानांनी लळिंग किल्ला वसवला. त्याकाळात या टेहळणीच्या किल्ल्याची निर्मिती झाली असावी.

ब्रिटीश काळातील बंडाच्या वेळी होळकरांच्या कागदपत्रांत याचा उल्लेख सापडण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांच्यासोबत राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, अविनाश जोशी काका, मनोज बैरागी हे या दुर्ग शोध मोहिमेत सहभागी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com