राममंदिर भूमिपूजनाचा जिल्हाभरात जल्लोष

अवघे नाशिक राममय
राममंदिर भूमिपूजनाचा जिल्हाभरात जल्लोष

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराचा अभूतपुर्व सोहळा होत असताना श्रीरामांंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरासह जिल्हाभरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपुर्ण नाशिक राममय झाल्याचे आज चित्र होते. शहरातील भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह अन्य विविध हिंदुत्ववादी संघटनांनी महाआरती व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध धार्मिक संस्था, संघटना तसेच नागरीकांनी याचा जल्लोष साजरा केला.

पंचवटीतील काळाराम मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. येथे विश्वस्त व पुजार्‍यांनी पाद्यपूजन केली. प्रवेशद्वारावरच श्री काळारामाच्या प्रतिमेचे पूजन करून पदाधिकार्‍यांनी दर्शन घेतले. येथे गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात होता. रामकुंड येथे आज सकाळी गोदावरी नदीचे पुजन करून येथील श्रीराम स्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी महाआरती करण्यात आली. श्रीराम स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण करण्यात आले. प्रसाद म्हणून पेढे तसेच लाडुचेही वाटप करण्यात आला.

सकाळपासूनच भाजप पदाधिकारी, कारसेवक, साधू महंत, विहीप, पुरोहित संघ यांच्या वतीने पूजा अभिषेक, आरती, रामरक्षा पठण आदी कार्यक्रम पार पडले. भारतीय जनता पक्षाच्या पंचवटी आणि तपोवन मंडळातर्फेकारसेवकांचे पाद्यपूजन करुन सान्मान करण्यात आला. कार्यक्रमास तिनही आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गंगापूररोडला भोसला मिलिटरी स्कूल कॅम्पस मध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात पहाटे महापूजा करण्यात आली सुमारे दीड तास चाललेल्या पूजेतून श्रीरामाची महाआरती करण्यात आली. गंगापूररोडच्या नसती उठाठेव मित्रमंडळाच्या वतीने मारुती मंदीर नरसिंहनगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन व मारुतीला अभिषेक केला,त्यानंतर सामुहीक रामरक्षा पठण व रामाची आरती करुन पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.

जुने नाशिक भद्रकाली येथील पुरातन मंदिरात आज प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले तसेच आरती व रामरक्षा पठण करण्यात आले पूर्वसंध्येला भद्रकाली मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. द्वारका येथील श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात विशेष सजावट व विग्रहांचा शृंगार करण्यात आला होता. वेणूधारी असलेले मदन गोपाल आज धनुर्धारी रुपात आपले दर्शन देत होते. दरम्यान संध्याकाळी भव्य दीपोत्सवाच्या व विशेष पूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी शेकडो भक्तांनी सहभाग घेतला होता.

नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात श्रीरामाची सामुदायिक आरती करण्यात आली. मुक्तिधामच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीरामाची व मंदिराची प्रतिकृती असलेला भव्य बॅनर लावला होता. तसेच मंदिराच्या बाहेर प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेलरोड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जय श्रीराम असलेल्या नावाचे मास्क वाटप करण्यात आले.

नवीन नाशिकमध्ये श्री सूर्यमुखी हनुमान मंदिर येथे प्रभू रामांच्या प्रतिमेचे पूजन करून गुढी उभारून आरती करून आनंदोत्सव साजरा केला. पाथर्डी फाटा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पेढे वाटून ,फटाके फोडून व अन्नदान करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी शंख निनादही करण्यात आला.

इंदिरानगर येथे भाजप प्रणित श्री प्रतिष्ठान च्या वतीने श्रीरामाच्या बारा फुटी मूर्तीचे पूजन करण्यात आले, कसमादे खान्देश युवा प्रतिष्ठानच्या वतीने माऊली लॉन्स परिसरात व अंबड पोलीस ठाणे परिसरातील सर्व नागरिकांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. विजयनगर येथे परिसरातील महिलांनी आपल्या आपल्या दारासमोर व रस्त्यावर रांगोळ्या काढून भगवी साडी परिधान केल्या होत्या.

यावेळी उपस्थित श्रीराम भक्त महिला व पुरुषांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले सर्वांना प्रसाद म्हणून लाडू वाटण्यात आले. संकटमोचन हनुमान व सिद्धेश्वर गणपती सेवा मंडळ वतीने दक्षिण मुखी हनुमान मंदिरामध्ये श्री रामाचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले .अश्विन नगर मित्र मंडळ,जय नवदुर्गा मित्र मंडळातर्फे अश्विन नगर येथील हनुमान मंदिर येथे आरती करून लाडू वाटप करण्यात आले. यावेळी फटाक्याच्या अतिष बाजीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

शहरात कडक बंदोबस्त

श्रीराम मंदिर भूमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळाराम मंदिर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासह शहरातील राम मंदिरे, धार्मिक आखाडे, संस्था, धार्मिक स्थळे, धार्मिक संघटनांची कार्यालये, संवेदनशिल परिसर, भाजप, शिवसेना पक्ष कार्यालये यांनाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गुप्त वेशातील पोलीस व गस्ती पथके दिवसभर कार्यरत होती.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com