नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र वानखेडे

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवड
नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र वानखेडे
नाशिक सायकलिस्ट्स

नाशिक । Nashik

नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी शहरातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र किसन वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत १० सदस्य वैयक्तिक अंतर ठेऊन प्रत्यक्ष तर दहाहून अधिक सदस्य ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते.

सिव्हील इंजिनियर असलेले राजेंद्र वानखेडे यांनी १९८३ पासून ते १९९९ पर्यंत शासकीय सेवेत पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर काम केले असून त्यानंतर शासकीय सेवेचा राजीनामा देऊन बांधकाम व्यावसायिक म्हणून सुरूवात केली. सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभागही मोठा आहे. प्रवीण खाबिया एनसीएफचे अध्यक्ष असताना वानखेडे यांनी उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. आता पुढील दोन वर्ष ते अध्यक्षपदी राहतील.

राजेंद्र वानखेडे पंढरपूर वारीत सात वेळा प्रत्यक्ष व नियोजनात सहभागी झाले असून दरवर्षी 2 ऑक्टोबरला होणाऱ्या नाशिक ते मुंबई एकता रॅलीची धुरा गेल्या चार वर्षांपासून वानखेडे यांच्याकडे आहे. 'लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे' अध्यक्ष असताना त्यांनी एनसीएफसोबत अनेक उपक्रमात सहकार्य केले आहे. न्यु ग्रेस अकॅडमी' शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असताना शाळेत सायकल अकॅडमीची स्थापन करून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन सायकलिंगकडे खेळ म्हणून बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्विमींग आणि चित्रकला यांची आवड असलेल्या राजेंद्र वानखेडे यांच्याकडे अनेक नवीन संकल्पना असून त्या अमलात आणायच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रत्नाकर आहेर यांच्याकडून पदभार स्वीकारून या पदी विराजमान होणारे वानखेडे नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे पाचवे अध्यक्ष असतील. विशाल उगले, दिवंगत जसपालसिंग विर्दी, प्रवीण खाबिया नंतर आहेर यांनी फाउंडेशनतर्फे अनेकाविध उपक्रम राबवून नाशिकला सायकल कॅपिटल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत

नाशिक शहराला सायकल कॅपिटल बनविणे हे एनसीएफचे ध्येय आहे. ते पुढे चालवून सध्याच्या करोनाच्या नंतर जगात आणि माणसाच्या जीवनशैलीत अनेक बदल होणार आहेत. त्यात सामाजिक अंतरासाठी सायकलचा वापर उपयोगी ठरत असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. त्याच अनुषंगाने नव्या जोमाने नाशिककरांनी सायकलचा वापर अंगीकारावा यासाठी काही दिवसांनी आठवड्यातील एक वार सायकलवार हि संकल्पना राबविण्याचा मानस आहे.

- राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com