
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील मालेगाव मर्चंन्ट्स को आँप बँकेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांची तर व्हाईस चेअरमनपदी गौतम शाह (Gautam Shah) यांची आज एकमताने निवड करण्यात आली. पदाधिकारी बिनविरोध निवडीची ५९ वर्षांची परंपरा यावर्षीदेखील संचालक मंडळातर्फे कायम राखली गेली...
मामको बँकेच्या मुख्य सभागृहात आज सकाळी ११ वाजता चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक फय्याज मुलानी अध्यक्षस्थानी होते.
चेअरमन पदासाठी राजेंद्र भोसले यांच्या नावाची सूचना दादाजी वाघ यांनी केली तर शरद दुसाने यांनी त्यास अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी गौतम शहा यांच्या नावाची सूचना भरत पोफले यांनी केली.
या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मुलानी यांनी भोसले व शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषणा करताच संचालकांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. निवडणूक प्रक्रिया पार पडताच नवनियुक्त चेअरमन राजेंद्र भोसले, व्हा. चेअरमन गौतम शहा यांचा संचालक तसेच बँक सेवकांतफै जनरल मॅनेजर कैलास जगताप यांनी सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी निवडणूक अधिकारी मुलानी यांनी बँकेच्या संचालक मंडळाने बिनविरोध निवडीच्या जपलेल्या परंपरेचे कौतुक केले.
चेअरमन पदावर निवड झाल्यानंतर मार्गदर्शन करताना भोसले यांनी बिनविरोध निवडीची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवल्याबद्दल संचालकांचे आभार मानले. करोना (corona) काळात चेअरमन भरत पोफले, व्हाईस चेअरमन संजय दुसाने यांच्या कार्यकाळात बँकेने भरीव प्रगती केली.
बँकेचा नफा, वाढलेल्या ठेवी, गुंतवणूकीत प्रतिकूल परिस्थितीत झालेली वाढ, बँकेच्या पारदर्शी कारभाराची तसेच सभासद, खातेदार ग्राहकांचा विश्वास कायम असण्याची साक्ष देणारी आहे. बँकेने कॅम्प, सटाणा नाका व वर्धमाननगर शाखेसाठी स्वमालकीच्या जागा घेत सभासदांची अनेक वर्षापासूनची ईच्छा पूर्ण केली आहे.
करोना संकटामुळे त्रस्त झालेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना सुलभतेने कर्ज उपलब्ध करून देत बँकेने त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम सुरू ठेवले आहे. संचालक मंडळाचे निस्वार्थ कार्य व अधिकारी सेवकांचे प्रामाणिक योगदान यामुळेच बँकेची प्रगतीकडे आश्वासक वाटचाल सुरू आहे. आपली बँक, आपली माणसे ही परंपरा आगामी कार्यकाळातदेखील जपली जाईल, अशी ग्वाही भोसले यांनी दिली.
यावेळी मावळते चेअरमन भरत पोफले , व्हा. चेअरमन संजय दुसाने यांनी संचालक व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निवडणूक अधिकारी फय्याज मुलानी, स्वप्नील मोरे यांचा संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला.
या सभेस सतीष कलंत्री, दादाजी वाघ, शरद दुसाने, भिका कोतकर, सतीश कासलीवाल, नरेंद्र सोनवणे, विठ्ठल बागुल, सुरेश सोयगावकर, मनीषा देवरे, मंगला भावसार, छगन बागुल, भास्कर पाटील, दिनेश ठाकरे, जवाहर नानावटी, निलेश पाटील, प्रकाश वाघ, मनिष पटणी, विजय भावसार, आदी उपस्थित होते. विशेष सभा यशस्वीतेसाठी कैलास जगताप, वीरेंद्र होनराव, मिलिंद गवांदे, राधेश्याम जाजू, संजय अहिरे आदींनी परिश्रम घेतले.