राज ठाकरे यांच्या दौर्‍याने कार्यकर्त्यांत उत्साह

मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार
राज ठाकरे यांच्या दौर्‍याने कार्यकर्त्यांत उत्साह

नाशिक । फारूक पठाण Nashik

आगामी नाशिक महापालिकेसह ( NMC Upcoming Elections )राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( MNS )स्वबळावर लढणार असे दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) हे नुकतेच दोन दिवसांच्या खासगी दौर्‍यावर आले होते. त्यांच्या दौर्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याचा परिणाम नाशिक महापालिका निवडणुकीत दिसून येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आगामी नाशिक महापालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना तसेच भारतीय जनता पक्षाची युती होण्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र देशपांडे यांनी मुंबईसह सर्व निवडणुका मनसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीत वेगळी चुरस निर्माण होणार आहे हे मात्र नक्की. नाशिक महापालिका निवडणुकीबाबत बोलले गेले तर यंदा युवानेते अमित ठाकरे यांच्या हातात प्रचार यंत्रणा राहणार आहे. त्यादृष्टीने अमित ठाकरे यांनी मागील दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे.

नाशिकमध्ये नव्याने 122 शाखाप्रमुखांची नेमणूकदेखील चार महिन्यांपूर्वी करण्यात आली. शाखाप्रमुख नेमणूक करताना प्रत्येकाची मुलाखत स्वतः अमित यांनी घेतली होती. साधारण 800 तरुणांची मुलाखत घेऊन 122 ची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुलाखत घेताना प्रभागातील राजकीय गणित, सामाजिक कामे, विकासाचे व्हिजन याबाबतदेखील ठाकरे यांनी प्रश्न विचारून आढावा घेतला होता. यामुळे नाशिकवर त्यांचे किती बारीक लक्ष आहे हे दिसून येते.

2012 ते 2017 या पाच वर्षांच्या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता होती. याकाळात नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्याचे आयोजनदेखील चोखपणे झाले होते. शहरातील रिंगरोड तयार करण्यापासून मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यावेळेला विशेष लक्ष देण्यात आले होते. तसेच बॉटनिकल गार्डन, गोदाघाट सुशोभीकरण, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प झाले आहेत. आमच्या काळात नाशिक महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे झाली मात्र एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर झाला नाही, असा दावा पक्षाचे नेते करत असतात.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडवट हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला असून राज ठाकरे हे आता हिंदू जननायक म्हणून जनतेसमोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दोन दिवसांचा नाशिक दौरा केला. त्यांचा दौरा खासगी असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते. तरीही त्यांनी पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांसह वरिष्ठांना विशेषत: आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे कामदेखील त्यांनी केले. राज यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीदेखील नाशिकला आल्या होत्या. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांसह पक्षाच्या सैनिकांमध्ये उत्साह वाढला. लवकरच त्यांचा राजकीय दौरादेखील होणार असून निवडणुकीत मनसेना चमत्कार करणार का? या प्रश्नाचे उत्तर निकालात मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com