
मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon
लहान असो की मोठा मग तो कोणत्याही धर्माचा असो त्यास सर्व ठिकाणी येण्या-जाण्याचा अधिकार देशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) रचित संविधानाने (Constitution) दिला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी असंसदीय भाषेचा वापर केल्याने उत्तरभारतीय नाराज आहेत. अशी वक्तव्ये करणे मोठ्या व्यक्तीस निश्चित शोभा देत नाही. उत्तर भारतीयांची माफी मागत केव्हाही उत्तरप्रदेश-अयोध्येत जावे, असा सल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपचे खा. साक्षी महाराज (BJP MP Sakshi Maharaj) यांनी येथे बोलतांना दिला.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जात असतांना खा. साक्षी महाराज यांनी येथील रॉयल हबमधील जियोचे वितरक समीर शेख यांच्या कार्यालयास आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. शेख यांच्या परिवाराबरोबर कौटुंबीक संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज येथे धावती भेट दिली होती. खा. साक्षी महाराज मालेगावी (malegaon) आल्याची माहिती मिळताच भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh), बजरंग दल (Bajrang Dal), विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आदी संघटनेचे पदाधिकारी तसेच भाजप महानगरप्रमुख मदन गायकवाड, मच्छिंद्र शिर्के, लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, नेविलकुमार तिवारी, यशवंत खैरनार, विजय देवरे, बाळा वारूळे, संजय काळे, पवन पुरोहित आदी पदाधिकार्यांनी खा. साक्षी महाराज यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.
उन्नाव येथे शेख कुटूंबाबरोबर पारवारिक संबंध असल्याने आपण येथे सदिच्छा भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या अयोध्या येथे भेट देण्याच्या दौर्यावरून वाद सुरू झाला आहे. याकडे खा. साक्षी महाराज यांचे लक्ष वेधले असता असंसदीय भाषेचा वापर केल्यामुळेच उत्तर भारतीय ठाकरे यांच्याबद्दल नाराज आहेत. अशी वक्तव्ये करणे मोठ्या व्यक्तीस निश्चित शोभा देत नाही. देशात हिंदू-मुस्लीम वाद (Hindu-Muslim debate) संपुष्टात येवून फक्त राष्ट्रवाद उरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या घोषणेच्या माध्यमातून मुस्लीम समाज देखील मोठ्या संख्येने भाजपशी जोडला गेला आहे.
मी स्वत: आज एका मुस्लीम कुटूंबाच्या घरात बसलो आहोत. देशाच्या संविधानाने व्यक्ती लहान असो की मोठा किंवा कोणत्याही धर्माचा असो त्याला देशात सर्व ठिकाणी ये-जा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांनी देखील मोठ्या मनाने असंसदीय शब्दांबद्दल उत्तर भारतीयांची क्षमा मागितली पाहिजे व उत्तर प्रदेशात गेले पाहिजे, असे मत देखील खा. साक्षी महाराज यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. आपल्या एक ते दिड तासाच्या सदिच्छा भेटीनंतर खा. साक्षी महाराज त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले.