
नाशिक | Nashik
जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर (unseasonal rains) प्रचंड उकाड्याने शहर व जिल्हावासीय हैराण असून मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवार (दि.०४) रोजी सकाळपासून वातावरणात बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची प्रतीक्षा संपणार असे चित्र आहे. अशातच आज त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर परिसरात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे...
नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) असून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. त्यातच वाऱ्याचा वेगही वाढला आहे. तापमानात मोठी वाढ झालेली असून ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापमान नोंदवले जात आहे. अशा वातावरणामुळे उकाडा असह्य होत असून पशु-पक्ष्यांनाही याचा फटका बसत आहे.
दरम्यान, नुकतेच त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. त्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. अशा परिस्थितीत आता पावसाने जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावल्यामुळे जिल्हावासीयांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे.