गारांसह वादळी पावसाचे थैमान

कांदा व्यापार्‍यांना कोट्यवधीचा फटका; जनजीवन विस्कळीत
गारांसह वादळी पावसाचे थैमान

चांदवड । प्रतिनिधी Chandwad

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अन् गारांच्या तुफान वर्षावासह मुसळधार पावसाने ( Heavy Rain ) चांदवड ( Chandwad )शहर व परिसरास अक्षरश: झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल अडीच ते तीन तास धुमाकूळ घालणार्‍या वादळी पावसात अनेक कांदा व्यापार्‍यांचे शेड भुईसपाट झाले, घरांचे पत्रे उडाले, वृक्ष उन्मळून पडले, विजेचे खांब कोसळले. या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यात माजी आ. शिरीष कोतवाल यांचाही समावेश आहे. कांदा भिजून व शेड कोसळल्याने व्यापार्‍यांना कोट्यवधीचा फटका बसला असून तालुक्याच्या काही भागातही पावसाच्या थैमानात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शहर परिसरात अचानक वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस व गारांचा वर्षाव सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्ते व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तसेच गारांचा अक्षरश: खच साचला होता. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना जागा मिळेल तिथे आश्रय घ्यावा लागला. पावसाचा जोर इतका होता की शहरातील असंख्य झाडे उसळून पडली. विद्युत खांबही मोठ्या प्रमाणात कोसळले असून अनेक भागात विद्युत तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करत रात्र अंधारात काढावी लागली.

कृषी बाजार समितीतील अनेक व्यापार्‍यांचे कांदाशेड वादळी वार्‍याने भुईसपाट झाले असून लाखो रुपयांचा कांदा पावसात भिजला तर काही कांदा वाहून गेला. कांदा भिजून व शेड कोसळून व्यापार्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. कांदा शेडमध्ये काम करणारे अनेक मजूर किरकोळ जखमी झाले असून काहींना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. त्यात माजी आ. शिरीष कोतवाल यांचा देखील समावेश आहे. पावसापासून बचावासाठी ते एका कांदा शेडमध्ये थांबले असता अंगावर शेड कोसळून ते जखमी झाले. त्यांच्या मणक्यास गंभीर दुखापत झाली. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. हेमराज दळवी यांनी कोतवाल यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवले. कॉलेज रोडलगतच्या रेणुका कॉम्प्लेक्समधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तेथील व्यावसायीकांची त्रेधातीरपीट उडाली.

तालुक्यातील हिरापूर, दहिवद, दिघवद, पाटे, कोलटेक, काजीसांगवी, साळसाने, निंबाळे, रायपूर, हिमवरखेडे, पाथरथेंबे, न्हनावे, दुगाव, उसवाड, डोंगरगाव, सुतारखेडे, निमगव्हाण, हरणूल, हरसूल, आहेरखेडे आदी भागातही मृग पावसाने जोरदार सलामी दिली. या पावसात शेतकर्‍यांच्या कांदाचाळींचे तसेच उघड्यावर पडलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगत अनेक झाडे उन्मळून पडली.

गत दोन दिवसांपासून उपरोक्त भागात वादळी पावसाची हजेरी लागत आहे. वादळी पावसात बाळकृष्ण जमादार व वामन जमादार यांच्या घरांचे पत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. डोक्याला पत्रा लागून बाळकृष्ण जमादार जखमी झाले असून त्यांच्या पत्नी मथुरा जमादार यांना भिंतीच्या विटा कोसळून हाताला जबर दुखापत झाली आहे. पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा व्यापारी व शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com