
इगतपुरी | प्रतिनिधी
महाराष्ट्रात तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या घोटी येथील सर्वात मोठ्या व्यापाऱ्याच्या राईस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून लाखो रुपयाचा रेशनच्या तांदळाने भरलेला टेम्पो जप्त केला घटनेने इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील सर्वात मोठा व्यापारी मे. भाकचंद केशरमल पीचा यांच्या राईस मिलमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातून या मिलवर येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती.
पोलीस अधिक्षक उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकत राईस मिलमध्ये आलेल्या टेम्पोतील लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ जप्त केला. संबंधित मिल मालक तुषार नवसुखलाल पीचा, टेम्पो चालक विलास फकीरा चौधरी आणि केडगाव ता. दौंड जि. पुणे येथील विक्रेता चेतन ट्रेडींग कंपनीचे मालक तथा ब्रोकर सिंघवी या तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे व भादवि २०१ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुका हा राईस उद्योगासाठी ओळखला जात असून ही सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स.पो.नि. प्रभाकर कारभारी निकम यांच्या टीमने या छाप्यात ४ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा १६,९०० किलो वजनी तांदूळ छापा टाकून पकडला आहे.
या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार गिरिश दिनकर निकुंभ यांनी फिर्याद दिली असून, पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार अवैध धंद्यावर घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत केडगाव, ता. दौंड, जि. पुणे येथून रेशन दुकानातुन जमा केलेला जुना तांदुळ घोटी गावात खुल्या बाजारात विक्रीकरिता येत आहे अशी माहिती मिळाली होती.
दरम्यान, या एकूण १६ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा माल गाडीसह जप्त करण्यात आला असून टेम्पो चालक विलास फकीरा चौधरी, केडगाव ता. दौंड जि. पुणे येथील चेतन ट्रेडींग कंपनीचे मालक व राईस मिलचे मालक तुषार जयसुखलाल पिचा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स.पो.नि. प्रभाकर कारभारी निकम आदी करीत आहेत.