सिन्नरला महसूल यंत्रणेचा मटका अड्डयावर छापा

प्रांतांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई
सिन्नरला महसूल यंत्रणेचा मटका अड्डयावर छापा

सिन्नर । प्रतिनिधी

 जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु असताना शहरातील सातपीर गल्लीत करोनाचे नियम पायदळी तुडवून अवैधरित्या सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर महसूलच्या पथकाने मंगळवारी (दि.18) छापा टाकला.

पोलिसांना घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी येण्यास टाळाटाळ केल्याने अखेर प्रांताधिकारी पुजा गायकवाड यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मंगळवारी महसूल विभागातील एक तलाठी, महिला तलाठी व कर्मचारी शहरातून गस्त घालत असताना सातपीर गल्लीत पाराजवळ काही तरुण आढळून आले. पथकाने त्यांच्याजवळ जात चौकशी सुरु केली. त्यावेळी येथे असलेल्या मटका अड्ड्यात पळापळ सुरु झाली. पथकाचा संशय बळावल्याने कर्मचार्‍यांनी आत जाऊन पाहिले असता 30 ते 40 जण मटका खेळताना आढळून आले.

विशेष म्हणजे यात महिलांचाही सहभाग होता. या पथकाने सिन्नर पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. तथापि पोलिसांनी येण्यास टाळाटाळ केल्याने अखेर प्रांताधिकारी पुजा गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली असता त्यांनी जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पथकाने मटका अड्डा चालकास कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल 10 हजारांचा दंड भरण्यास सांगितले तथापि त्यास नकार देत संबंधित मटका अड्डा चालकाने फोनाफोनी करुन राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. अखेर या पथकाने 20 ते 25 हजारांची रोकड, मटका खेळण्यासाठी वापरल्या जाणार्‍या चिठ्ठ्या जप्त करुन मटका अड्डा चालकाला 5 हजार रुपये दंडाची कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com