लखमापूर । Lakhmapur (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला. परंतु रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांनी या अस्मानी संकटावर मात केल्याने बळीराजांच्या आशेला नवचैतन्य निर्माण झाले आहे.

मागील हंगामाची नुकसान मालिका रब्बी हंगामातही झाल्याने दिंडोरी तालुक्यातील बळीराजांची त्रेधातिरपीट उडाली होती. आता अवकाळी पावसाने रब्बी हंगाम पुर्णपणे वाया जाईल या भितीने शेतकरी वर्ग भयभीत झाला होता.

परंतु बळीराजांला नशीबाने साथ दिल्याने अवकाळी पावसाचा फटका आर्ली द्राक्षे पिकाला बसला. परंतु गहु, हरभरा पिके वाचल्याने बळीराजांने सुटकेचा श्वास सोडला. यंदा पावसाळ्यात मागील हंगामाच्या कमी पाऊस पडला. परंतु जो कमी पाऊस झाला त्यांने बळीराजांच्या नगदी भांडवल देणार्या पिकांचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकरी वर्ग पुर्णपणे हतबल झाला होता.

अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहुन कर्ज उपलब्ध करून रब्बी हंगामातील पिकांना पसंती देत गहु, हरभरा या पिकांची पेरणी करून रब्बी हंगामाला सुरुवात केली. परंतु अवकाळी पाऊस, वातावरणांचे बलते रूप, पाणी मिश्रित धुके, यामुळे रब्बीतील पिके वाया जाते की काय? असा सवाल बळीराजांसमोर ‘आ’ वासुन उभा राहिला.

नंतर थोड्याच दिवस थंडीचे आगमन चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे ते वातावरण गहु, हरभरा पिकांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे यंदा गहु व हरभरा याचे उत्पादन वाढले, अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या गहु पिकांला ओंब्या चांगल्या बहरल्या आहे.

हरभरा या पिकांला पण घाटे चांगल्याप्रकारे आल्यामुळे या दोन्ही पिकांची उत्पादन क्षमता व सरासरी वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे हेक्टरी चांगल्या उत्पन्नांची आशा निर्माण झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील रब्बी हंगामाची स्थिती परिक्षण पाहणीनुसार चांगली पाहायला मिळत आहे. वातावरणाचे सध्या स्वरूप उत्तम असल्यामुळे यंदा गहु व हरभरा या पिकांचे उत्पादन विक्रमी होण्याच्या स्थितीत आहे. यंदा दिंडोरी तालुक्यात गव्हाची पेरणी जवळजवळ 6797 हेक्टर आहे. हरभरा या पिकांचे पेरणी 3071 हेक्टर एवढे असुन एवढी पेरणी शेतकरी वर्गाने पुर्ण केली आहे.
अभिजित जमधडे, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी

पुरेसा पाऊस पडल्याने रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. जमिनीतील ओलावा रब्बी हंगामातील गहु व हरभरा या पिकांच्या वाढीस पोषक आहे.पिके चांगली बहरली आहे. चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
विश्वनाथ देशमुख, संचालक कादवा कारखाना