Peace Committee Meeting
Peace Committee Meeting|Sinnar
नाशिक

सिन्नर : सार्वजनिक नको कुटूंबातच गणपती बसवा

शांतता समितीची बैठक

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । Sinnar

सध्या करोनाचे गंभीर असे संकट संपूर्ण देशात पसरले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले.

सिन्नर पोलीस ठाण्याच्यावतीने चांडक कन्या विद्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस उपअधिक्षक माधव रेड्डी, तहसिलदार राहूल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार व्यासपिठावर उपस्थित होते. गर्दी कमी केल्यास करोनाचा संसर्ग वाढणार नाही. त्यामूळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना महिनाभर आधीच जाहीर केल्या आहेत.

गेल्या चार साडेचार महिण्यांपासून पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, नगर परिषद या सर्वच यंत्रणांवर ताण आला असून या उत्सवाच्या काळात हा ताण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर परिषदेने गणेश विसर्जनासाठी उपनगरांमध्ये कृत्रिम तळे तयार करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

गणेशाच्या आगमनाच्या वेळी व विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढता येणार नाही. कारण राज्यात अजूनही संचारबंदी लागू असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनीक गणेश मंडळांना परवानगी मिळणार नाही. मात्र, घरामध्ये गणेशाची स्थापना करण्यास कुठलीही अडचण नाही. सार्वजनिक गणेश मंडळांना नगर परिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून यापूर्वी असणाऱ्या नियमांबरोबरच यंदा मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरची व्यवस्था मंडळांना करावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बाळासाहेब हांडे, दत्ता वायचळे, डॉ. व्ही.एम. अत्रे, डॉ. विजय लोहरकर, भाऊसाहेब शिंदे, प्रा. आर.के. मुंगसे, सोनल लहामगे, राजाराम मुरकुटे यांनी विविध सुचना केल्या. नामदेव कोतवाल यांनी सुत्रसंचलन केले. पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

रुग्ण संख्या वाढणे परवडणारे नाही

शहरात चारशेपेक्षा अधिक संख्येने करोनाचे रुग्ण असतानाही शहर त्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नसल्याची खंत तहसिलदारांनी व्यक्त केली. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे हे आपल्यासह आपले कुटूंब सुरक्षित राहण्यासाठी फायद्याचे आहे. करोनाची व्याप्ती कमी करण्यासाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. चेहऱ्यावरील मास्क खाली घेऊ नका यासाठी स्वत:बरोबरच इतरांनाही सावध करा. रुग्णसंख्या वाढणे परवडणारे नसल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता घरगुती स्वरुपातच कुटूंबासमवेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com