‘पदवीधर’ मतदानाकरिता जांभळ्या रंगाचाच स्केचपेन

‘पदवीधर’ मतदानाकरिता जांभळ्या रंगाचाच स्केचपेन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणत्याही रंगाचा किंवा अन्य पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरल्यास ते मतदान बाद ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

मतदान करताना पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून या रकान्यात 1 हा अंक लिहिणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी 1 हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा लागणार आहे. उमेदवारांच्या संख्येइतके पसंती क्रमांक उपलब्ध आहेत. उरलेल्या उमेदवारांसाठी आपल्या पसंतीक्रमानुसार अनुक्रमे 2, 3, 4 असे नोंदवावे लागणार आहे.

कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवावा लागणार आहे. पसंतीक्रम हे फक्त अंकांमध्येच नोंदवावे लागणार आहेत. अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये म्हणजे 1, 2, 3 किंवा रोमन लिपीमध्ये म्हणजे ।, ॥, ॥। किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील लिपीमध्ये पसंती क्रमांक नोंदवता येईल. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षर, नाव किंवा कोणताही शब्द लिहिता येणार नाही.

अंगठ्याचा ठसा उमटवता येणार नाही. पसंतीक्रम दर्शविण्यासाठी चौकोनी खूण केली तर मतपत्रिका अवैध ठरणार आहे. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे 1 हा अंक नमूद करावा. इतर पसंतीक्रम नोंदवणे बंधनकार नसल्याचेही गमे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com