विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

पोलीस व नगरपरिषदेची संयुक्त कारवाई
विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

सिन्नर । सुनिल जाधव Sinnar

करोनाचा संसर्ग फोफावू लागल्यामुळे सिन्नर शहरात विना मास्क फिरणार्‍यांविरोधात प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील विविध भागात व दुकानांमध्ये जाऊन विना मास्क आढळेल्या व्यक्तींकडून दंड वसूला आहे.

राज्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. सिन्नर तालुक्यातही करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नियमांची काटेकोरपणे नागरीकांनी अमंलबजावणी करावी असे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. करोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना या संसर्गाचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील नियमांची पायमल्ली करीत नागरीक बिनदिक्कतपणे विनामास्क शहरात फिरत आहे.

नागरीकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाला प्रतिबंध घालण्यासाठी आज दिवसभर शहरात पोलीस व नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी फिरुन विनामास्क फिरणार्‍यांकडून दंड वसूल केला आहे. लालचौक, शिवाजी चौक, नवापूल, नासिक वेस, बारागाव पिंप्री रोड या भागासह मुख्यपेठेतील दुकानांमध्ये विनामास्क आढळणार्‍या दुकानदारांकडून 100 रुपये दंड घेत मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याधिकारी संजय केदारे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन आवारी, अमोल गाडे, विनायक आहेर यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी ही मोहिम राबविली.

करोनाची लक्षणे असणार्‍या रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. नियमांची अंमल बजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार जनतेला आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करुन विनामास्क शहरात फिरणार्‍या नागरीकांना चाप बसावा यासाठी पोलीस व नगरपरिषदेतर्फे दंडात्मक मोहिम राबविण्यात आली आहे. त्यात 103 जणांकडून 100 रुपयाप्रमाणे दंड वसूल करत त्यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंगल कार्यालयांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून यापुढील काळातही शहरात विनामास्क फिरणार्‍या नागरीकांकडून दंड वसूल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

संजय केदारे, मुख्याधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com