रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

रेल्वे गाड्यांमध्ये ( Railway )प्रवाशांच्या मदतीसाठी लावलेल्या साखळीचा अनावश्यक व गैरवापर (Unnecessary and misuse of the chain pulling )करणार्‍यांविरुद्ध मध्य रेल्वेने कठोर पाऊल उचलले आहे. 1 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत रेल्वे डब्यांतील साखळी अनावश्यक ओढून गाडी थांबवण्याची 157 प्रकरणे घडली. त्यातील 108 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित प्रवाशांकडून 47,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेने उपनगरीय आणि मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानुसार प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशीरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे, चढणे आदी क्षुल्लक कारणांसाठी करतात. रेल्वेमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट रेल्वेच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाहीतर त्या रेल्वेच्या मागून चालणार्‍या गाड्यांवरही परिणाम होतो.

मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये मेल, एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. अशा अवास्तव अलार्म चेन पुलींग घटनांवर मध्य रेल्वे मुंबई विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. यात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलींगचा सहारा घेऊ नये.

अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचण्याचे आणि मर्यादित सामान घेऊन जावे. प्रवाशांना बॅटरीवर चालणार्‍या कारच्या सेवांचाही वापर करता येईल किंवा स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात उपलब्ध व्हीलचेअरचा वापर करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इच्छित डब्यापर्यंत पोहोचू शकतात. जेणेकरून गाड्यांमध्ये चढणे सुरळीतपणे आणि वेळेत करता येईल. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर टाळता येईल.

Related Stories

No stories found.