Nandgaon
Nandgaon
नाशिक

४५ जणांवर दंडात्मक कारवाई

मास्कचा वापर टाळला; सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना शहरात तोंडाला मास्क न लावता दुचाकीवर फिरणार्‍या ४५ जणांविरूध्द दंडात्मक तर ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर नसल्याचे दिसून आल्याने एका दुकानास सील करण्याची धडक कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांच्या नेतृत्वाखाली पथकातर्फे केली गेली.

शहरात करोनाचा उद्रेक वाढत असतांना नागरीकांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिसत असलेली अनास्था तसेच प्रतिष्ठांनातून सुरक्षित अंतराचा फज्जा उडविला जात असल्याचे निराशादायक चित्र दिसून येत आहे. याकडे दै.‘देशदूत’मधून वृत्त प्रसारीत होताच त्याची दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांनी दखल घेत मास्क न लावणार्‍या तसेच ग्राहकांमध्ये दुकानात सुरक्षित अंतर न ठेवणार्‍या व्यावसायिकांविरूध्द धडक मोहिम हाती घेतली आहे.

दुचाकीवर संपुर्ण शहरात मास्क न लावता फिरणार्‍या ४५ जणांवर प्रत्येकी दोनशे रूपये दंडात्मक कारवाई नगरपालिका पथकातर्फे यावेळी करण्यात आली तर गांधी चौकात एका मोबाईल दुकानात 8 ग्राहक सुरक्षित अंतर न राखता उभे असल्याचे मुख्याधिकारी डॉ. देवचक्के यांच्या निदर्शनास आल्याने सदर दुकान तातडीने सील करण्याचे आदेश त्यांनी पथकास दिले.

या धडक कारवाईने परिसरातील व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शहरातील गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक व महात्मा फुले चौक परिसरात नगरपालिका पथकातर्फे आज कारवाई केली गेली. मास्क न लावता दुचाकीवर फिरणार्‍यांचे दंडात्मक कारवाईमुळे धाबे दणाणले होते. दरम्यान, नगरपालिकेने सुरू केलेल्या या धडक मोहिमेचे नांदगाववासियांनी स्वागत केले आहे.

शहर परिसरात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य यंत्रणेव्दारे तोंडावर मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे आदी निर्देश देण्यात आले आहेत. मात्र त्याचे पालन नागरिक व दुकानदार करत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरूध्द दंडात्मक तसेच प्रतिष्ठान सील करण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सदर मोहिम दररोज राबविली जाणार आहे.

डॉ. श्रेया देवचक्के ,मुख्याधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com