अजित पवार यांच्या सहभागामुळे पुन्हा 'स्पीड' मिळण्याची शक्यता

अजित पवार यांच्या सहभागामुळे पुन्हा 'स्पीड' मिळण्याची शक्यता

नरेंद्र जोशी

नाशिक | Nashik

पुणे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी जोडणारा पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या सहभागामुळे पुन्हा स्पीड मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेेऊन ‘स्पीड’ देण्याच्या सुचना केल्या आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मान्यतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रस्तावाला गती देण्याकरिता आता महारेल कंपनीलाच प्रस्ताव देण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.

महारेलद्वारे हा प्रकल्प साकारण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या प्रकल्पाला आता गती मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नाशिक - पुणे हा २३२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एकूण २२ गावांमधून जाणार आहे. सिन्नरमधील १७, तर नाशिक तालुक्यातील पाच गावांचा त्यामध्ये समावेश आहे. या द्रुतगती रेल्वेमार्गासाठी काही गावांत जमिनींचे संपादनही सुरू झाले.

जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी दर प्रशासनाने जाहीर केले. परंतु, त्यानंतर ही प्रक्रिया थांबलेली होती. महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि रेल्वेमार्गाच्या कामाला ब्रेक लागला.

परंतु, अजित पवार सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यामुळे या रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माँण झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सुधारित आराखडा ‘महारेल’मार्फत सादर करण्यात आला होता.

दृष्टीक्षेपातील प्रकल्प

- पुणे - नाशिकमधील अंतर : २३५ किलोमीटर - प्रवासाचा कालावधी : पावणे दोन तास

- प्रकल्पाचा अंदाजित खर्च : १६,०३९ कोटी रुपये

- प्रस्तावित स्टेशन : २०

-नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एकूण २२ गावांमधून जाणार

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com