सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाही : कदम
नाशिक

सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नाही : कदम

Abhay Puntambekar

ओझर। वार्ताहर Ozar

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी दरवर्षी साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवास ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही असे प्रतिपादन जि.प. सदस्य यतीन कदम यांनी केले आहे..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने दुर्गा देवी माता मंदिरात आयोजित बैठकीत कदम बोलत होते. याप्रसंगी पो.नि. भगवान मथुरे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, ग्रामसेवक दत्तात्रय देवकर, ग्रा.पं. प्रकाश महाले, सचिन मोगल, महावितरणाचे अधिकारी विक्रम सोनवणे, प्रशांत पगार, शिवसेना शहर प्रमुख नितीन काळे उपस्थित होते. यावेळी यतीन कदम यांनी गणेश मुर्ती विक्रेत्यांना विश्वसत्य महाविद्यालयात जागा उपलब्ध करुन दिली जाणार असून ज्यांच्याकडे खासगी जागा आहे त्यांनी आपल्या खासगी जागेत विक्री करावी असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयाने दिलेल्या नियम व अटींना अधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. तसेच गणेश मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने परवानगी घ्यावी. सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण होईल अशा मंडळाना परवानगी दिली जाणार नाही. स्थापना व विसर्जन मिरवणूकीला परवानगी नाही, जागेवर पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी परवानगी दिली आहे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनीही मनोगत व्यक्त करीत करोना प्रादुर्भाव विचारात घेता ग्रामपालिकेने मांडलेल्या सूचनांचा आदर करत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com