नांदूरशिंगोटेत आजपासून जनता कर्फ्यू

बंद
बंद

नांदूर शिंगोटे । वार्ताहर NandurShingote

नांदूरशिंगोटे परिसरात करोना बाधीतांची संख्या वाढत आहे.

वाढणारा फैलाव रोखण्यासाठी नांदूर शिंगोटेत आज (दि.२८) पासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय रेणूका माता मंदिराच्या सभागृहात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या दोन-तीन महिण्यांपासून गाव व परिसरात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने चिंतेने ग्रासलेल्या ग्रामस्थांनी बैठक घेण्याची मागणी सरपंच गोपाळ शेळके यांच्याकडे केली होती.

या बैठकीत वाढता संसर्ग रोखण्यासाठी सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

या सात दिवसात दवाखाने, औषधांची दुकाने व पीठ गिरणी वगळता सर्व व्यावसाईक दुकाने बंद राहणार आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नांदूरमध्ये आजूबाजूच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात.

कुणी किराणा, धान्य खरेदीसाठी येते. कुणी दवाखान्यात येते. यासर्वांवर नियंत्रण ठेवणे अवघड होत असल्याने करोनाचा संसर्ग वाढतो आहे. यात अनेक व्यापारी, सर्वसामान्यांना करोनाचा संसर्ग झाला असून हा वाढता संसर्ग चिंताजनक आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूशिवाय अन्य पर्याय नसल्याची भावना दिपक बर्के, अनिल सानप, उपसरपंच नानासाहेब शेळके, गणेश घुले, संदिप भाबड, वाळीबा इलग यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली.

त्यानंतर सरपंच गोपाळ शेळके यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. गेल्या चार महिण्यात शासनाचा लॉकडाऊन वगळता पाच वेळा जनता कर्फ्यू पूकारण्याची वेळ आली. या काळात सर्व ग्रामस्थांना मास्क, सॅनेटायझर पूरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली. संपूर्ण गावात अनेकदा औषध फवारणी केली.

मात्र, एवढा सर्व खर्च पेलण्याची ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामूळे यापूढच्या काळात या सर्व सेवा पूरवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्क वापरावा, सॅनेटायझरचा वापर करावा असे आवाहन शेळके यांनी केले.

शासनाच्या 108 रुग्णवाहिकेचे चालक कचरु बोडके यांनी करोनाचे गांभीर्य उपस्थितांसमोर ठेवले. दोडीसह परिसरातील करोना बाधीतांना नाशिकच्या विविध रुग्णालयात पोहचवतांना बेड मिळत नसल्याने कशी दमछाक होत यावर त्यांनी प्रकाश टाकला. अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. मास्कशिवाय घराच्या बाहेर पडू नका. फारच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घरातच थांबा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com