घोटीत आजपासून जनता कर्फ्यू

घोटी पोलीस ठाणे येथे बैठक; व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय
घोटीत आजपासून जनता कर्फ्यू

घोटी । वार्ताहर

इगतपुरी तालुक्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असून तालुक्यातील करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 300 च्या वर गेली आहे. याच अनुषंगाने घोटीत आढावा बैठक घोटी पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानंतर नऊ दिवसीय जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हॉस्पिटल व मेडिकल सुविधाव्यतिरिक्त संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील घोटी ही व्यापारासाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी तालुक्यासह ठाणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याकारणाने शहरातील गर्दी कमी होत असताना दिसत नसल्याने तातडीने बैठक आयोजित केली होती. घोटी पोलीस ठाण्यातील आयोजित कोरनासंदर्भातील आढावा बैठकीत आ. हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, ग्रामपालिका सरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, सचिन गोणके, हिरामण कडू, हरिष चव्हाण, ग्रामपालिका पदाधिकारी व व्यापारीवर्ग यांची बैठक झाली.

या बैठकीत दि. 17 ते 25 एप्रिलपर्यंत नऊ दिवस जनता कर्फ्यूचे म्हणजे संपूर्ण शहर कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आ. खोसकर यांनी व्यापारीवर्गाला घोटी हॉटस्पॉट बनू नये म्हणून आपण उपाययोजना राबवत असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण योग्य नियोजन करून बंद ठेवल्यास साखळी तोडू शकतो, असे मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना तहसीलदार कासुळे, सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच रामदास भोर यांनी मार्गदर्शन केले. करोनाची साखळी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.

शनिवारपासून दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण घोटी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. कुणीही दुकाने उघडे ठेवल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार संबंधित व्यापार्‍यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

याप्रसंगी घोटी ग्रामपालिका सरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, सचिन गोणके, हिरामण कडू, प्रशांत रुपवते, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, संदीप जाधव, हरिष चव्हाण, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांच्यासह बैठकीत नियोजनामध्ये किराणा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान गायकवाड, मिलन शहा, युवराज टाकळकर, भाजीपाला फ्रुट असोसिएशनचे विजय गोसावी, सतीश कडू, यांच्यासह व्यापारी बैठकीस उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com