दिंडोरीत उद्या पासून जनता कर्फ्यू

दिंडोरीत उद्या पासून जनता कर्फ्यू

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून करोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण दुसर्‍या टप्प्यात वाढत आहे. त्यामुळे दिंडोरी शहरातील करोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिंडोरी शहरात सोमवार, दि. 19 ते शुक्रवार, दि. 30 एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व व्यापारी, पदाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यावेळी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. या ऑनलाईन बैठकीत दि. 19 ते 30 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल स्टोअर्स व दुग्ध व्यवसाय सोडून बाकी सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. भाजीबाजार व रस्त्यावर लागणारी दुकानेसुद्धा बंद राहणार आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही संकल्पना वापरून कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शासनाचे नियम पाळावे, अन्यथा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे दिंडोरी शहरातील 45 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण आवश्यक करून घ्यावे, असे आवाहन दिंडोरी शहरातील प्रशासन व व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आजपासून जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला असून सात दिवस जनता कर्फ्यू सुरू राहणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार धनराज महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय जाहीर

करण्यात आला. दिंडोरी शहरात आणि तालुक्यात करोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना जागा मिळत नसून रेमडिसीव्हर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची वणवण सुरू झाली आहे. नातलगांनाही वणवण करावी लागत आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळेच जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. ठिकठिकाणच्या सरपंचांनी, सदस्यांनी, ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना एकत्र येऊ देऊ नये, विनाकारण दुकाने उघडी ठेवू नये तसेच गर्दी करणार्‍यांना व विनामास्क फिरणार्‍यांना दंड करावा, अशा सूचना नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी धनराज महाले यांनी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे आवाहन केले. बैठकीस माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, जि. प. सदस्य भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com