कळ्वणच्या पश्चिम भागात लसीकरणासाठी जनजागृती

आदिवासी बांधवांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा : मीना
कळ्वणच्या पश्चिम भागात लसीकरणासाठी जनजागृती

कळवण । प्रतिनिधी

करोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कळवण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी करोना लसीकरणचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदिवासी बांधवाना केले आहे.

कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात लसीकरणसंदर्भात आदिवासी बांधवामध्ये अफवा पसरवून गैरसमज केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आ. नितीन पवार यांनी आदिवासी भागात कमी प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे यांना आदिवासी भागातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार बी. ए. कापसे होते.

करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, अशी विनंती सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आयोजित बैठकीत नागरिकांशी संवाद साधताना केली.

कळवण तालुक्यातील मोहमुख, बिलवाडी, सुकापूर, वडपाडा, पळसदर, मोहपाडा, देवळीकराड,लिंगामा, आमदर या गावांना भेटी देऊन नागरिकांना करोना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.

आदिवासी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी हे लसीकरण करून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा करोनापासून बचाव करावा. ज्या नागरिकांनी लसीकरण केले आहे त्यांनी इतरांना लसीकरणासाठी प्रबोधन करावे. कळवण उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मोफत लसीकरण सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका प्रशासनाने तालुक्यातील जनतेला यावेळी केले आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य जगन साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, छबूलाल कुवर यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे सभापती, उपसभापती, संचालक, पोलीस पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीसह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com