पोलिओ निर्मूलनासाठी जनजागृती- डॉ. भावसार

मालेगाव हॉटस्पॉट; पालकांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार
पोलिओ निर्मूलनासाठी जनजागृती-  डॉ. भावसार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

भारत पोलिओ मुक्त झाला असला तरी धोका टळलेला नाही. अशातच पाकिस्तान, अफगाणिस्तान पाठोपाठ अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये देखील पोलिओ विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे पोलिओचा धोका लक्षात घेत रोटरी क्लबतर्फे पुन्हा पोलिओ निर्मूलन मोहीम (Polio Eradication Campaign)हाती घेण्यात आली आहे. मालेगाव हॉटस्पॉट असून शहरात अजून देखील गैरसमजातून बालकांना पोलिओ डोस देणे नाकारले जात आहे. त्यामुळे पोलिओचा शिरकाव होवू नये यासाठी शहरातील मौलवी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने 24 ऑक्टोबरपासून रोटरीतर्फे शहरात पोलिओ निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अभियानप्रमुख डॉ. दिलीप भावसार यांनी दिली.

येथील रोटरी नेत्र रूग्णालय सभागृहात रोटरी क्लब अध्यक्ष संजय बेंडाळे यांच्यासह अभियानप्रमुख डॉ. दिलीप भावसार, सचिव प्रशांत पाटील, दिलीप संन्याशिव, विजय पोफळे, अ‍ॅड. उदय कुलकर्णी आदी पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत रोटरीतर्फे पोलिओ निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाची माहिती दिली.

भारत 2014 मध्ये पोलिओमुक्त झाला होता. मात्र मागील वर्षापर्यंत पाकिस्तान व अफगाणिस्तान हे दोनच देश पोलिओग्रस्त होते. भारताने पोलिओ निर्मूलनामध्ये मोठा पल्ला गाठला असला तरी एक जरी नवीन रुग्ण इतर देशांमध्ये पोलिओचा निघाला तरी त्याचा धोका सर्व जगाला असतो. भारत पोलिओमुक्त असला तरी अनेक मुलांनी अद्याप पोलिओचे डोस घेतलेले नाही. त्यामुळे भारतात अजूनही पल्स पोलिओ मोहिम राबवावी लागत असल्याचे स्पष्ट करत डॉ. भावसार पुढे म्हणाले, यावर्षी नवीन समस्या उद्भवली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानापाठोपाठ अमेरिका व इंग्लंड या देशातही पोलिओचे विषाणू सापडले आहेत. इतर देशातून हे विषाणू आले आहेत. रुग्ण सापडत नसले तरी विषाणू मात्र जिवंत आहेत. हा मोठा धोक्याचा इशारा ठरला आहे. त्यामुळे थोडीही शिथिलता पोलिओचा आजार उग्रस्वरूप धारण करण्यास कारणीभूत ठरणार असल्याने रोटरीतर्फे पुन्हा जागतिक पोलिओ दिनाचे औचित्य साधून पोलिओ निर्मूलन जनजागृती अभियान हाती घेण्यात आल्याचे डॉ. भावसार यांनी स्पष्ट केले.

शहरात अद्याप अनेक कुटूंबांनी आपल्या बालकांना पोलिओचे डोस दिलेले नाहीत. आरोग्य सेवक गेल्यास त्यांना शिवीगाळ व दमबाजी करून हाकलून देण्याचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटूंबांमध्ये पोलिओबाबत जनजागृती व्हावी या डोसबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी मशिदीतून नमाजाच्या वेळेस पोलिओ डोस घेण्याबाबत मौलवींतर्फे आवाहन देखील केले जात आहे. शहरातील प्रत्येक वार्डात मौलवी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांच्या सहाय्याने घराघरात जावून पालकांना पोलिओ डोस देण्याबाबत मनपरिवर्तन करण्याचे काम रोटरीतर्फे हाती घेण्यात आल्याचे डॉ. भावसार यांनी शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ. शकील अल्ताफ, विनोद गोरवाडकर, सनी पोरवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com