आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृती महत्वाची !
मानव विकास कॅम्प

आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृती महत्वाची !

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे !


नाशिक । Nashik

करोनाची परिस्थिती आटोक्यात येत असली तरी स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात लसीकरणासाठी जोर दिला जात असतांना आदिवासी समाज आजही लसीकरणापासून दूर राहत आहे.

आदिवासी समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर देशदूतने ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरणाबाबत प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांच्याकडून घेतली आहेत.

लसीकरण केल्यास त्रास होतो, मृत्यू ही झाले आहेत!
- प्रत्येक लस ही तयार करताना जागतिक आरोग्य संघटना तसेच जीवशास्त्रीय सर्व मानके पूर्ण करून, त्याच्या चाचण्या करूनच तिला परवानगी दिली जाते. यामुळे लस ही पूर्ण सुरक्षित आहे. यामुळे मृत्यू होतो या अफवा आहेत. लस दिल्यानंतर सगळ्यांनाच त्रास होत नाही. ज्यांना होतो अगदी किरकोळ स्वरूपाचा असतो. यामुळे घाबरून जाऊ नये.

करोना आजार व लसीकरणाबाबत जनजागृती आवश्यक
- शासन, सामाजिक संस्था, सामाजिक माध्यमे सर्वांच्या वतीने लसीकरणाबाबत जनजागृती चालू आहे. ग्रामीण भागातील सुशक्षित युवकांनी यामधे पुढाकार घेण्याची गरज आहे.

दवाखान्यात मरण्यापेक्षा आम्ही घरात मरू !
- कोणताही आजार, प्रामुख्याने कोरोना या आजाराबाबत गैर समज तसेच दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते, घरी राहून हा आजार बरा होत नाही. उलट यातून घरातील इतर सदस्य, लहान मुले, वयोवृध्द यांना याची बाधा होऊन आपण त्यांच्या जीवाचा खेळ करू नये, लक्षणे जाणवताच डॉक्टर कडे जावे.

आम्ही मातीतील माणसं, आम्हाला काय व्हनार नाय !
- हा गैरसमज आहे. ज्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे व ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांना करोना होणारच. सध्या ग्रामीण भागातच करोनाचा अधिक फैलाव वाढला आहे.

टेस्ट तर नकोच, शेजारी पाजारी विचारत पण नाय..!
- करोना मध्ये लक्षणे दिसताच तपासणी करून घेऊन तात्काळ उपचार सुरू करणे आवश्यक असते. कोणी विचारावे म्हणून नाही. तर स्वतःच्या, कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी टेस्ट व उपचार घ्या.

लसीकरण ऑफलाईन व्हावं
- लसीकरण सर्वांपर्यंत सुरळीत पोहचावे यासाठीच शासनाने त्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा आग्रह घरला आहे. ज्या ठिकाणी अडचणी येतील, त्या ठिकाणी ऑफलाईन ही नोंदणीच प्रयत्न शासन करत आहे.

आदिवासी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी हे लसीकरण करून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा करोनापासून बचाव करावा. ज्या नागरिकांनी लसीकरण केले आहे त्यांनी इतरांना लसीकरणासाठी प्रबोधन करावे. आदिवासी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मोफत लसीकरण सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com