पं. प्रभाकर दादासाहेब दसककर - एक सात्विक गुरूमूर्ती

पं. प्रभाकर दादासाहेब दसककर - एक सात्विक गुरूमूर्ती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ज्येष्ठ संगीत शिक्षक तसेच वादक Senior music teacher as well as musician पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर Pt. Prabhakar Dadasaheb Dasakkar आज आपल्यात नाहीत. त्यानिमित्त पं. अविराज तायडे Pt. Aviraj Tayde यांनी त्यांना अर्पण केलेली शब्दांजली!

सुमारे वीस-एकवीस वर्षापूर्वी मी दसककर वाड्यात पहिल्यांदा गेलो. जिना चढून वरच्या खोलीत गेलो. एका लोडाला टेकून एक अत्यंत तेजस्वी, सात्विकतेची मूर्ती, थोडेसेे खुंटे वाढलेली दाढी तेे त्यांंच्या सौंदर्यात अधिक भर घालीत असलेली एक मूर्ती बसली होती. मुलगा सुभाष म्हणाला, आमचे दादा! माझे हात आपोआप नतमस्तक झाले. मी दादांना खाली वाकून नमस्कार केला. दादांनी मनापासून आशिर्वाद दिला. बसायला सांगितले व घरात माझ्यासाठी काही करायला सांगितले.

दादांची व माझी ही पहिली भेट! या पहिल्या भेटीतच दादांच्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा व सात्त्विकतेचा परिचय झाला. त्यानंतर दादांची सातत्याने भेट होऊ लागली. परिचय अधिकाधिक दृढ होऊ लागला. दादांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा थोडाफार अभ्यास करायला मिळाला. नाशिकच्या संगीत क्षेत्रात दादांचे नाव अतिशय आदराने घेतले जायचे. दादांचा शिष्य परिवारही खूप मोठा आहे. माणसाला मोठेपण उगाच मिळत नाही. त्यासाठी तेवढी तपश्चर्या करावी लागते.

दादांच्या चेहर्‍याकडे पाहिल्यानंतर ज्ञानाचा व आपल्या कलेप्रती असणार्‍या त्यांच्या भक्तीचा परिचय व्हायचा. अत्यंत गोड गळा व शिकवण्याची हातोटी. गुरू कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पं. दादासाहेब तथा पं. प्रभाकर दसककर होय.

सातत्याने एकाच विषयाचा एवढा प्रदिर्घ अभ्यास केलेल्या साधुचा किंवा ऋषीचा चेहरा जसा वलयांकृतीत असतो तसा मला दादांचा वाटायचा. ते भजन अत्यंत तल्लीन होऊन म्हणायचे. कोणत्याही प्रकारचे अवडंबर न करता गाण्यासाठी आपण आहोत ही समर्पणाची भावना हा त्यांचा स्थायीभाव होता असे मला वाटतो.

सुमारे पन्नास-पंच्चावन्न वर्षापूर्वी त्या वेळेच्या पद्धतीनुसार स्त्रियांनी ङ्गगायन वादन करणे म्हणजे समाजात चेष्टेचा विषय. त्या काळात दादांनी स्त्रियांमधील सुप्त गुण ओळखून भजनाचे वर्ग चालू केले व ते अत्यंत यशस्वीपणे सुरूच ठेवले. अत्यंत दर्जेदार शिक्षण, रागावर आधारीत भक्तीगीते, भजने, गौळणी इत्यादीद्वारे आपल्या शिष्यांना त्यांनी संगीत शिकवले. आजही दादांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक स्त्रिया संगीताचे वर्ग अत्यंत यशस्वीपणे चालवित आहेत.मला वाटते कालसंक्रमणातली ही त्यांची कृती म्हणजे नाशिक संगीत क्षेत्राला खरोखरच मोठे योगदान आहे.

व्यक्ती तेवढ्या वल्ली, माणसे तेवढा स्वभाव. पं. दसककरांंच्या कालखंडात अनेक गुणीजनांनी सेवा केली. दादांनी आपल्या स्वभावाप्रमाणे खूप माणसे जोडली. कोणाशी वैर नाही. हेवे-दावे नाहीत. प्रसिद्धीची हाव कधी धरली नाही. कोणाच्या पश्चात चेष्टा केली नाही. सर्वांवर आणि संगीतावर मनापासून प्रेम केले. त्यामुळेच आज माझ्यासारख्या अनेक संगीतप्रेमींचे हात आपोआप नतमस्तक होतात. असे म्हणतात की, मोठ्या वृक्षाखाली लहान रोप तग धरत नाहीत. परंतु दादासाहेब जसे आदर्श गुरू त्याचप्रमाणे आदर्श पालकही होते. आपल्या मायेच्या छायेत त्यांनी आपली मुले माधव, सुभाष, संजय यांच्याबरोबर आपल्या नातवंडांनाही सांगितीक वारसा दिला. आज त्यांची मुले व नातवंडे आपल्या घराण्याचा वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. दादांच्याच आशिर्वादाने संगीत क्षेत्रात ते सगळे आपले नावलौंकीक करतील यात कुणाच्याही मनात दुमत नाही.

दादांना संगीतातील अनेक मानसन्मान प्राप्त झाले होते. थोरामोठ्यांचे, साधुसंताचे आशिर्वाद प्राप्त झाले होते. ते खर्‍या अर्थाने संगीत जगले. नाशिक नगरीचे भाग्य होते की, पं. दादासाहेबांसारखा ऋषीतुल्य, गायनाचार्य, तपस्वी नाशिकमध्ये वास्तव्याला होता.

(लेखक एस. एम. आर. के. महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com