कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा

माजी आ. दिपीका चव्हाण
कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा

डांगसौंदाणे । वार्ताहर Dangsaundane / Baglan

रब्बी हंगामास सुरवात झाली असून थंडीच्या कडाक्यात बळीराजा रात्री-अपरात्री शेतपिकांना पाणी देण्यासाठी जात असल्याने अनेक समस्या उदभवत आहेत .

काही ठिकाणी तर शेतकर्‍यांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने रब्बी हंगामात शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी बागलाणच्या माजी आ. दिपीका चव्हाण यांनी केली आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात माजी आ. चव्हाण यांनी तालुक्यात ग्रामीण भागात कृषीपंपांना रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधले. खरीपानंतर रब्बी हंगाम हा सर्वाधिक महत्वाचा असुन रब्बी मधील गहू, हरभरा, कांदा व अन्य पिकांसाठी शेतकर्‍याला पिकांना पाणी द्यावे लागते. यासाठी शेतकर्‍यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांना आपल्या जीवाची पर्वा करीत पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागते.

अशा वेळेस जंगली श्वापदांचा हल्ला होण्याची शक्यता असते तर अनेक वेळेस सर्पदंश, इलेक्ट्रिक शॉक सारख्या गोष्टीचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकदा शेतकर्‍यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारसह वीज वितरणने शेतकर्‍यांना थ्रीफेज विद्युत पुरवठा हा दिवसा करावा जेणेकरून शेतकरी कुठल्या ही अनुचित घटनेचा बळी ठरणार नसल्याचे चव्हाण यांनी शेवटी नमूद केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com