इंडियासाठी खेळणे हाच अभिमान

आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू आकांक्षाचे उद्गार
इंडियासाठी खेळणे हाच अभिमान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिशक्ती देवीची विविध रूपे आपण बघतो. हीच रूपे आज अनेक कार्यक्षेत्रात पाहावयास मिळत आहेत. ‘देशदूत नवदुर्गा’ उपक्रमात Deshdoot Navdurga Campaign आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू आकांक्षा कातकाडे International rugby player Akanksha Katkade हिच्यासोबत कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. आजची नवदुर्गा असलेली आकांक्षा मोठे स्वप्न उराशी बाळगून कारकीर्दीची वाटचाल करत आहे.

रग्बी खेळात आकांक्षा कातकाडे ही फॉरवर्ड स्थानावर खेळते. तिची आई गृहिणी असून वडील शेतकरी आहेत. अशा कुटुंबातील ही मुलगी कोणालाही परिचित नसलेला खेळ खेळते आणि त्या खेळात ती जिल्हा, राज्य, राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारते ही चकित करणारी बाब आहे. भगूर येथे स्थायिक असलेल्या आकांक्षाला खेळाचे बाळकडू देवळाली कॅम्पच्या नूतन विद्यामंदिर येथून मिळाले. आई-वडिलांनी दिलेला भक्कम पाठिंबा आणि खेळण्याबाबत दिलेले स्वातंत्र्य हेच यशाचे रहस्य असल्याचे तिने गप्पांमध्ये सांगितले.

रग्बी खेळाची ओळख पुरुषप्रधान आणि शरीरयष्टी मजबूत असलेल्यांचा खेळ असा सर्वसाधारण समज आहे. आकांक्षाने ही मानसिकता बदलायला भाग पाडले. शाळेत असताना 13 व्या वर्षी तिने मैदानी खेळ खेळण्यास सुरुवात केली. 4 ते 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या खेळाडूंना रग्बी खेळताना पाहून आपणही हा खेळ खेळू, असा विचार तिच्या मनात आला आणि तिथून तिचा रग्बी खेळाचा प्रवास सुरू झाला.

या प्रवासात अनेक खाचखळगे आले. मात्र कुटुंबाची मजबूत साथ आणि प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी यामुळे येणार्‍या सर्व अडचणींवर तिने मात केली. आकांक्षा या खेळात आज इंडियाचे नेतृत्व करत आहे.

शालेय, जिल्हा, विभागीय, राज्य आणि मग राष्ट्रीय पातळीवर टप्प्याटप्पाने तिची निवड होत गेली. आकांक्षाने उझबेकिस्तान येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत फॉरवर्ड स्थानावर प्रतिनिधित्व केले. यासाठी ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात तिने सर्व चाचण्यांना यशस्वी तोंड दिले. आई-बाबांची भक्कम साथ आणि त्यांनी केलेले संस्कार, दिलेली शिकवण यामुळेच मी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत असल्याने आत्मविश्वास दुणावत आहे. आपल्या देशासाठी आणखी काय करता येईल हाच विचार मनात सुरू असतो, असे आकांक्षाने सांगितले.

देशासाठी काम करणार

दुसर्‍या देशात मायदेशाचे प्रतिनिधित्व करताना आकांक्षाला अभिमान वाटतो. तो एक सुवर्ण क्षण असतो. दुसर्‍या देशात भारताचे राष्ट्रगीत वाजते आणि राष्ट्रध्वज डौलाने फडकत असतो तो क्षण कायमस्वरूपी मनाच्या पटलावर कोरावासा वाटतो. राष्ट्रासाठी काहीतरी करण्याचे मी ठरवले आहे. लष्करीसेवा किंवा देशासाठी काम करण्यासाठी कोणत्याही सेवेत जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आकांक्षा म्हणाली.

Related Stories

No stories found.