वृत्तपत्र वाचक धन्यवाद देतात तेव्हा कामाचा अभिमान वाटतो!

वृत्तपत्र वाचक धन्यवाद देतात तेव्हा कामाचा अभिमान वाटतो!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

‘वृत्तपत्र (पेपर) News Paper टाकणारा मुलगा’ असा शब्द अनेकांनी ऐकला असेल, पण ‘पेपर टाकणारी महिला’ असे क्वचितच ऐकले असेल. दररोज पहिल्या चहाच्या कपासोबत वाचण्यासाठी लागणारा पेपर ऊन-वारा, पाऊस-पाणी अशा कोणताही ऋतूची पर्वा न करता आपल्यापर्यंत पोहोचवतो पेपरवाला! त्याच्या येण्याची प्रतीक्षा असते.

आजचा समाज स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करीत असला तरी काही कामे पुरुषप्रधान म्हणूनच पाहिली जातात. अशा समजांना छेद देऊन काही महिला चाकोरीबाह्य कर्तृत्व गाजवत आहेत. पुरुषांची मक्तेदारी मोडण्यासाठी वृत्तपत्र विक्री व्यवसायात आता महिलाही उतरत आहेत. घरोघरी वृत्तपत्र टाकणार्‍या नाशिकच्या सोनाली देसाई Sonali Desai यांच्याशी ‘देशदूत नवदुर्गा’ Deshdoot Nav Durga उपक्रमात कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. त्या मुलाखतीचा निवडक भाग.

महिला घरोघरी दररोज वृत्तपत्र पोहोचवू शकतात, असा विचारही कोणी केला नसेल. हे काम करणे किती अवघड आहे?

- अवघड तर आहे, पण एकदा सवय झाली की ती अंगवळणी पडते.

पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात तुमचा प्रवेश कसा झाला?

- आमचा वृत्तपत्र (पेपर) विक्रीचा व्यवसाय आहे. मला नोकरी करण्याची इच्छा होती. त्यावेळी इतरत्र कामे करण्यापेक्षा घरच्याच व्यवसायात मी लक्ष घालावे, असे घरातील सदस्यांनी सुचवले. इतकेच नव्हे तर त्याकरता प्रोत्साहनही दिले. माझी क्षमता मला समजली. आता तर घरातील जबाबदार्‍या सांभाळून मी वृत्तपत्र विक्री व्यवसाय करीत आहे.

घरोघर वृत्तपत्र टाकण्याचे काम आपण करु शकतो, हा आत्मविश्वास कसा निर्माण झाला?

- सुरुवातीला काही गोष्टी समजायला थोडा वेळ लागला, पण नंतर हळूहळू सवयीने गोष्टींची उकल होत गेली. कामे करण्याचा आणि जबाबदारी पेलण्याचा विश्वास तयार झाला.

दिवसाची सुरुवात कधी आणि कशी होते? घर आणि व्यवसाय यांची सांगड कशी घालता?

- सकाळी पाचपासूनच कामाची सुरुवात होते. वृत्तपत्राचे पार्सल आणण्यापासून वृत्तपत्रे घरोघर टाकण्यापर्यंत, त्यात कामावर असणार्‍या मुलांना सांभाळून घ्यावे लागते. ते नसतील त्या वेळी नियोजनात बद्दल करून त्या जागी स्वतः जावून वृत्तपत्रे ग्राहक वाचकांपर्यंत पोहोचवावी लागतात.

व्यवसायात दिलेल्या शब्दाचे किती महत्त्व आणि जबाबदारी असते?

- वृत्तपत्र विक्री व्यवसायात एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ग्राहकांपर्यंत पेपर वेळेत पोहोचवायचा असतो. कधी उशीर झाला तरी अनेक ग्राहक सहकार्य करतात. बर्‍याचदा पावसा-पाण्यातही वेळेवर पेपर टाकण्याचा प्रयत्न असतो. अशावेळी अनेक ग्राहक आज पेपर टाकण्यासाठी आला नसता तरी चालले असते, असे सहज म्हणतात.

कोणत्या परिसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करता?

- माऊली लॉन्स, पवननगर, अंबड गाव आणि तसेच इतर बर्‍याच भागात आम्ही सेवा पुरवतो.

वृत्तपत्रांचे अंक कसे वाटता? कोणत्या ग्राहकाला कोणते वृत्तपत्र द्यायचे ते कसे लक्षात ठेवता?

- मी दुचाकीवरून पेपर टाकते. वृत्तपत्रांची अदलाबद्दल होऊ नये म्हणून घरीच ग्राहकांनुसार पेपरक्रम लावून घ्यावा लागतो. त्यानुसार पुढे त्याचे क्रमाने वाटप करतो. विशिष्ट वृत्तपत्र वाचण्याची सवय असलेल्या एखाद्या ग्राहकाला चुकून दुसरे वृत्तपत्र टाकले गेले तरी ते सहकार्य करतात. अशा वेळी त्यांना वृत्तपत्र बदलून देतो, पण असा प्रकार क्वचितच घडतो.

वृत्तपत्रांचे अंक वाटताना रस्ते कसे लक्षात ठेवता? कधी गोंधळ होतो का?

- सुरुवातीला रस्त्याचा क्रम लक्षात ठेवणे जरा अवघड जायचे, पण सवयीने पुढे तो गोंधळ राहिला नाही. रस्त्यांची आणि घरांची चांगली ओळख झाली आहे.

वृत्तपत्राचे अंक टाकायला साधारणतः किती वेळ लागतो?

- साधारणपणे मी अडीचशे पेपर दररोज घरोघर टाकते. त्यासाठी दोन-अडीच तास लागतात.

वृत्तपत्र अंक टाकताना काही वेळा अनेक मजले चढून जावे लागते. त्यासाठी मानसिक तयारी कशी केली?

- मनाची तयारी ठेवावीच लागते. बर्‍याचदा सोसायटीत सोय असूनही लिफ्टचा वापर फक्त सभासदांसाठी असतो, तेव्हा अनेक मजले चढून जावून पेपर टाकावा लागतो.

पेपर वेळेत देतात म्हणून कोणी कधी आभार मानले का?

- हो, असे ग्राहक आहेत. त्यांना आमच्या कामाची जाणीव आहे. भरपावसात त्यांना घरपोच आणि वेळेत वृत्तपत्र मिळते तेव्हा ते खूपदा धन्यवाद देतात. त्यावेळी आपण करीत असलेल्या कामाचा अभिमान वाटतो. थकवा विसरायला मदत होते आणि काम करायला उत्साह येतो.

वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात यापुढे वाढ करण्याचा काही विचार आहे का?

- नक्कीच! कुठल्याही व्यवसायात जशी प्रगती, त्याची व्याप्ती, वाढ अपेक्षित असते, तशीच आमच्या व्यवसायात ती करण्याची तयारी आहे.

करोनाकाळात लोकांच्या घरापर्यंत तुम्ही जात होता. संसर्गाची भीती वाटली नाही का?

- करोनाचे संकट मोठे होते, पण भीतीसारखे काही वाटले नाही. आम्ही सर्वतोपरी काळजी घेवून वृतपत्र वाटप करीत होतो. मात्र अनेक ग्राहकांनी त्या काळात वृत्तपत्र घेणेच बंद केले होते. त्या सगळ्या काळात आमच्या घरात वृत्तपत्रांचा ढीग असायचा, पण त्यामुळे आम्हाला कधी करोना झाला नाही आणि कोणालाही तसे काही होऊ नये.

महिला म्हणून वृत्तपत्र विक्री व्यवसायात काम करताना या क्षेत्रातील इतर सहकार्‍यांकडून कसा प्रतिसाद मिळाला?

- एकाच क्षेत्रात काम करताना स्पर्धा असली तरी सगळेच जण वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतात. खास करून मागच्या काळात आर्थिक आवक कमी होती. अशावेळी एकमेकांना आर्थिक आणि मानसिक सहकार्य प्रत्येक जण करीत होता.

तुमच्या या चाकोरीबाह्य कामाबद्दल बोलल्यानंतर नवरात्रीनिमित्ताने देवीकडे काय मागणे आहे?

- घरच्यांनी मेहनतीने उभारलेल्या या व्यवसायाला भरभराटी येवो! स्वतःसाठी काही मागायचे तर घरचे सदस्य, मुले सुखी राहोत. त्यातच माझे सुख आहे.

Related Stories

No stories found.