महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख टाळल्या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध केला.

3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान नाशिक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 94 व्या साहित्य संमेलनाचा गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य समारातील मेरुमणी समजले जाते. 1938 साली मुंबई येथे झालेल्या 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र असून त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे.

तरीसुद्धा साहित्य संमेलनाचा ज्या गीतामध्ये झाडून झटकून अनेकांचे उल्लेख आठवणीने केले असतानाही क्रांती आणि साहित्याचे अग्रदूत असणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनुल्लेखाने टाळून आयोजकांनी नाशिककर तसेच प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांचाच अपमानच केला आहे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे.

आयोजकांनी ही चूक त्वरित सुधारावी तसेच साहित्य संमेलनाच्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देऊन स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा निषेध प्रत्येक राजकीय पक्षाने करणे अपेक्षित आहे. हा राजकीय विषय नसून साहित्यिक आणि राष्ट्रभक्तांच्या अस्मितेचा विषय आहे. बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि भूमिकांमुळे राजकीय पक्षांची बोटचेपी भूमिका यामुळे लोकांसमोर येत आहे.

परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे की नाशिकचे भूमिपुत्र असणार्‍या स्वातंत्र्यवीरांचा हा अपमान मनसेना कधीही सहन करणार नाही. आपले आदर्श आणि अस्मिता यांच्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही तडजोड करणार नाही, असे म्हटले आहे. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सचिव व प्रवक्ते पराग शिंत्रे, मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com