
दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad
देवळा तालुक्यातील दहिवड, उमराणे परिसरातील सुमारे 50 ते 60 विद्यार्थी हे महाविद्यालयीन तसेच तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी देवळा येथे दररोज ये-जा करत असतात....
कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना दहिवड, उमराणे, खारीपाडा येथे बस परत येण्यासाठी उपलब्ध नव्हती. याबाबत त्यांनी देवळा बस स्थानकाचे व्यवस्थापक यांना विचारणा केली असता त्र्यंबक यात्रेमुळे बस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रहारचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांना कळविले असता ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी देखील राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र बसच उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरात पायी मोर्चा काढला.
तसेच स्थानकात उभे असलेल्या सटाणा आगाराच्या बसच्या टपावर चढत राज्य परिवहन महामंडळाचा निषेध व्यक्त केला. यापूर्वी देखील अनेकदा असाच प्रकार घडल्याने विद्यार्थी तसेच प्रवाशांना अनेक तास बसची वाट बघत बसावे लागले आहे.
विद्यार्थी वर्गाच्या वतीने महिन्याच्या पासचे पैसे अगोदर जमा करून देखील बस उपलब्ध होत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहारचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी दिला आहे.