न्यूमोनियापासून बालकांचे होणार संरक्षण

पीसीव्ही लसीकरणाचे उद्घाटन
न्यूमोनियापासून बालकांचे होणार संरक्षण

पेठ | वार्ताहर | Peth

राज्यासह देशात न्यूमोनियामुळे (Pneumonia) बालमृत्यू अधिक होत आहेत. बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात नियमित लसीकरणामध्ये आरोग्य विभागाने या वर्षापासून न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (Pneumococcal conjugate vaccine) अर्थात पीसीव्ही लसीकरणाचा (PCV vaccination) समावेश केला आहे...

त्यामुळे आदिवासी भागासह शहरात न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यास मदत होणार असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे (Dr. Yogesh More) यांनी पेठ जनता विद्यालयाच्या बिडकर सभागृहात उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितले.

या लसीचे उद्घाटन पेठ पंचायत समितीचे सभापती विलास आलबाड (Vilas Albad) यांच्या हस्ते करण्यात आले. न्यूमोकोकल आजार हा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे.

शरीरातील विविध भागात पसरून वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकत असल्याने पाच वर्षांच्या आतील बालकांना हा आजार बळावतो. हे न्यूमोनियाचे प्रमुख कारण आहे. तसेच श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे.

त्यामुळे फुफ्फुसाला सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन धाप लागणे, खोकला, खाण्या- पिण्यात अडचण निर्माण होणे, फिट येणे, बेशुद्ध होऊन मृत्यूदेखील होऊ शकतो.

यासाठी पीसीव्हीचा बालकांना वयाच्या 6 व्या आठवड्यात पहिला डोस, 14 व्या आठवड्यात दुसरा डोस आणि नवव्या महिन्यात तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.

यावेळी जि. प. सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, दंडाधिकारी संदीप भोसले, गटविकास आधिकारी जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. देवरे, डॉ. माळी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नाईक, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनंदा महाले आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्यातील काही स्तनदा मातांच्या अपत्यांना पहिला पीसीव्हीचा डोस मिळाला. यावेळी लस टोचक आरोग्यसेविका चंद्रकला घोडे यांनी स्तनदा माता दुर्गा जाधव, बबिता चव्हाण, मनीषा गवळी, रोहिणी चौधरी यांच्या बाळांना न्यूमोकोकेल आजारापासून प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला पीसीव्हीचा डोस दिला.

नियमित लसीकरणात बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटावायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी आदी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही लस दिली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com