संसर्ग प्रतिबंधासाठी औद्योगिक क्षेत्र सुरक्षित ठेवा
नाशिक

संसर्ग प्रतिबंधासाठी औद्योगिक क्षेत्र सुरक्षित ठेवा

निमातील बैठकीत एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी गवळी यांचे प्रतिपादन

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. निमा-सिन्नर येथे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत बोलत होते. प्रांतधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पंडीत लोंढे व्यासपीठावर उपस्थित होते.

संपूर्ण जगात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉकनंतर नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सिन्नर तालुकाही त्यात मागे नाही. तालुक्यात दोन औद्योगीक वसाहती असून तेथे कामगार, अधिकारी हे नाशिक येथून येत असतात. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असल्याने कर्मचारी व कामगारांची सुरक्षा महत्वाची आहे.

ज्या कंपन्यांमध्ये दोन अथवा तीन शिफ्ट सुरु आहेत तेथे कामगारांना येण्या-जाण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ ठेवावा. या अर्ध्या तासात कामगार ज्या ठिकाणी काम करत होते, त्याठिकाणी संपूर्ण सॅनिटाईझ करूनच नवीन कामगारांना कंपनीत प्रवेश द्यावा. कंपनीच्या गेटवर कामगाराना सॅनिटाईझरद्वारे चेक करूनच प्रवेश दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

औद्योगिक क्षेत्राचा कामगार आत्मा असून त्याची काळजी कंपनीने घेतली पाहिजे. ज्या कंपनीचा कामगार हा दोन ते तीन दिवसापासून गैरहजर आहे, त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याला कामावर घेऊ नये. कंपनीत सर्वानी मास्क वापरणे महत्वाचे असून कोणीही आपले मास्क इतरांशी बोलताना काढून बोलू नये, मास्क अटकून न ठेवता, ते नियमित नाकाला चांगल्या प्रकारे लावणे गरजेचे असल्याचे डॉ. पठारे म्हणाल्या.

कोणतेही वाहन आणत असतील तर हे वाहन संपूर्ण सॅनिटाईझ करूनच पार्किंग झोनमध्ये लावणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयासाठी औद्योगिक वसाहतीकडून मदत होत असल्याबद्दल कोताडे यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचलन अतुल अग्रवाल यांनी केले. आभार उपाध्यक्ष सुधीर बडगुजर यांनी मानले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com