नाशिक | Nashik

येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळाच्या घटक संस्था; तसेच संलग्न व समाविष्ट संस्थांकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञानवादी लेखक डॉ. बाळ फोंडके, कथाकार भारत सासणे, प्रख्यात लेखिका सानिया,

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि लेखक जनार्दन वाघमारे यांच्या नावांचा प्रस्ताव महामंडळाकडे आला आहे. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचे कळते.

नाशिकच्या लोकहितवादी संस्थेला यंदाचे ९४ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका आणि अध्यक्ष निवडीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची २३ आणि २४ जानेवारी रोजी नाशिक येथे बैठक होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ नागपूर या चार घटक संस्था; तसेच छत्तीसगड, बडोदा, भोपाळ आणि गोवा या चार संलग्न संस्था, आंध्र प्रदेश व कर्नाटक या समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो असे १९ जण बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्षपदासाठी नावावर एकमत न झाल्यास आवाजी मतदानाद्वारे सर्वाधिक पसंती असलेल्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. नारळीकर आणि सासणे यांच्या नावासाठी पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्याचे समजते.