महामार्गावरील समस्यांबाबत केंद्राकडे प्रस्ताव

महामार्गावरील समस्यांबाबत केंद्राकडे प्रस्ताव

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक तीनवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे टोल वसुलीसाठी टोलनाक्यावर लागलेल्या रांगा याविषयाची खा. हेमंत गोडसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यावरील उपाययोजनांचा सविस्तर प्रस्ताव गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला आहे. खा. गोडसे यांनी सुचविलेल्या उपाययोजना न्यायिक असून त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने राज्य शाखेला दिले आहेत.

या ठोस कृतीमुळे आता नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे लवकरच बुजविले जाणार असून अवघ्या तीन ते पाच मिनिटांत वाहने टोलनाक्यावरून पास होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे आणि मुंबईहून नाशिककडे येणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याविषयीची खा. गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार केलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी खा. गोडसे मुंबईला जात असताना त्यांना घोटी टोलनाक्यावर वाहनांच्या लागलेल्या रांगा आणि त्यात अडकलेली अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देताना टोल नाक्यावरील अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर पडलेले खड्डे आणि त्यामुळे टोल वसुलीसाठी घोटी टोलनाक्यावर लागलेल्या रांगा या विषयाची खा. गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर आशिष आसाटी यांची भेट घेतली.

महामार्गावर पडलेले खड्डे चोवीस तासांच्या आत बुजविलेच गेले पाहिजे. तसेच टोलनाक्यावरून वाहन अवघ्या तीन ते पाच मिनिटांच्या आत पास झालेच पाहिजे. या नियमांचे पालन होण्याविषयीचा प्रस्ताव यावेळी गोडसे यांनी गडकरी व आसाटी यांच्याकडे सादर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com