नाशिक ।प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात देखील दिवाळीनंतर करोना संसर्ग वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेची स्वतंत्र अशी आरटीपीसीआर चाचणी लॅब कार्यरत व्हावी, यादृष्टीने प्रशासनाकडुन हालचाली सुरु झाल्या आहे. येत्या काही दिवसात आयसीएमआर यांना यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे काम महपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडुन सुरू झाले आहे.

राज्य शासनाकडुन दुसर्या करोना लाटेच्या शक्यतेनुसार उपाय योजना व उपचार सुविधा अधिक चांगल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दुसर्या लाटेत तात्काळ चाचण्या, चांगल्या प्रकारे तात्काळ उपचाराची सुविधा देण्याची तयारी प्रशासनाकडुन करण्यात आली आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत नाशिक महापालिकेची स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब कार्यरत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडुन लॅबसंदर्भातील प्रस्ताव येत्या सात आठ दिवसात तयार करुन तो आयसीएमआर यांना पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे.

महपालिकेतील करोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता, सध्या आरटीपीसीआर चाचण्याकरिता संशयित रुग्णांचे नमुने हे औरंगाबाद व मुंबई याठिकाणी पाठविले जात असुन त्यांचा अहवाल येण्यात एक दिवसापेक्षा जास्त कालावधी जात आहे. परिणामी संशयितांकडुन करोना संक्रमणाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात दररोज 900 ते 1000 या दरम्यान संशयित दाखल होत असुन त्यांची लक्षणे पाहुन नमुने घेतले जात असुन हे प्रमाण वाढते आहे. या नमुने तपासणीत वेळ जाऊ नये म्हणुन आता महापालिका प्रशासनाकडुन नाशिकरोड बिटको रुग्णालयात लॅब करिता जागा अंतीम करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर करोना चाचणीसाठी लॅबचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

करोना लॅबकरिता दीड कोटींचा खर्च...

करोना चाचणी तपासणी लॅब उभारणीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च असुन याचा खर्च डीपीटीसी यांचा निधी व मनपाचा काही निधी अशा खर्चातून लॅब उभारली जाणार आहे. याकरिता डॉक्टर, लॅब टेक्नीशियन यांच्यासह 20 जणांचा स्टाफ लागणार असुन याचा वेगळा खर्च येणार आहे.

ही लॅब सुरू झाल्यानंतर काही तासांत करोना निदान होऊन संशयितांवर उपचार झाल्याने करोना संक्रमण रोकण्यास मदत होणार आहे. करोना गेल्यानंतरच्या काळात देखील महापालिकेला स्वाईन फ्लू, डेंग्यु, मलेरिया अशा विषाणूच्या साथीच्या रुग्णांची तात्काळ तपासणी करुन नागरिकांवर मोफत उपचार करता येणार आहे.