आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेने करोना नियंत्रणात

मालेगाव तालुक्याचा नावलौकिक करोना योध्द्यांमुळे वाढला : डॉ. शेवाळे
आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेने करोना नियंत्रणात

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरासह तालुक्यात फैलावलेला करोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने घेतलेले विशेष परिश्रम कौतुकास्पद आहे. गत दीड वर्षापासून वैद्यकिय अधिकारी, सेवक अविश्रांत बाधीतांची सेवा करत असल्यामुळेच अनेकांचे प्राण वाचू शकले. आरोग्य विभागातील सर्वच घटकांचे योगदान मालेगावचा नावलौकिक वाढविणारे ठरले असल्याचे प्रतिपादन मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी येथे बोलतांना केले.

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र व स्वामिन फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षापासून अविरीतपणे उत्कृष्ट आरोग्यसेवा देणार्‍या डॉक्टरांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना डॉ. शेवाळे बोलत होते.

प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, मविप्र संचालक डॉ. जयंत पवार, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेश निकम, देवळा तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुभाष मांडगे, समिती समन्वयक डॉ. संदीप पवार, डॉ. अनिल पाटील, प्रा. प्रशांत गावंडे, स्वामिन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सागर पाटील व सचिव डॉ. भूषण वाणी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

करोनावर प्रतिबंध बसावा या दृष्टीकोनातून लसीकरण अभियान आरोग्य यंत्रणेतर्फे व्यापकतेने राबविले जात असल्यानेच 64 हजारापेक्षा जास्त लाभार्थींनी करोना लसीकरण पूर्ण केले आहे. हे निश्चित कौतुकास्पद आहे. आरोग्य यंत्रणेने संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्यासाठी सज्ज राहावे, अशी सुचना डॉ. शेवाळे यांनी शेवटी बोलतांना केले.

करोना काळात ग्रामीण भागातील डॉक्टरांनी चांगले काम केले आहे. रूग्ण व संशयितांचे योग्य ट्रेसिंग, गावागावात करण्यात आलेली करोना तपासणी, रूग्णांवर वेळेवर औषधोपचार, लसीकरण यासाठी आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम केले असल्याची प्रशंसा प्रांत विजयानंद शर्मा यांनी यावेळी बोलतांना केली. आयएमए अध्यक्ष डॉ. जयंत पवार यांनी करोना योध्दा डॉक्टर व सेवकांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी ‘औषध आपल्यादारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. आयुर्वेद मार्गदर्शक वैद्य अपश्चिम बरंठ यांनी आयुर्वेदिक वनस्पती व त्याचे मानवी जीवनास उपयुक्तता व रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांना विशेष करोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी औषधी वनस्पतीचे ही वाटप करण्यात आली. अमोल निकम यांनी सूत्रसंचालन केले तर नंदकिशोर कासार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पवार, निमेश वसावे, राजू घ्यार, महेश काटे, जितेंद्र पाटील, भटू शिंदे, देवीदास हिरे आदींनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com