नवीन पाइपलाईनसाठी प्रकल्प अहवालाच्या सूचना

 नवीन पाइपलाईनसाठी प्रकल्प अहवालाच्या सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणातून ( Gangapur Dam ) बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात ( Water Filtration Plant )1200 मिमी व्यासाच्या आणि तब्बल 22 वर्षे जुन्या दोन सिमेंट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात येते. या जुन्या पाइपलाइन बदलण्यासाठी केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगातून महापालिकेला 224 कोटी रुपये देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या तोंडी सूचना प्राप्त झाल्यानंतर पालिकेने यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल( Detailed project report )तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

13 किमी लांबीच्या या दोन्ही पाइपलाइन नवीन झाल्यास नाशिकला होणार्‍या विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या कायमची सुटणार आहे. नाशिक शहराची सध्या अंदाजे लोकसंख्या 20 लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका गंगापूर, दारणा, मुकणे या . धरणातून दररोज सरासरी 530 दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाते. दरवर्षी 15 ऑक्टोबर ते 31 जुलै या कालावधीसाठी धरणांतील पाणीसाठा आरक्षित केला जातो.

यंदा नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरण समूहातून 4000 दशलक्ष घनफूट, मुकणेतून 1500 दशलक्ष घनफूट तर दारणातून 100 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र या सर्वात शहराला 80 टक्के पाणीपुरवठा हा गंगापूर धरणातून केला जातो. गंगापूर धरणातून कच्च्या स्वरूपात पाणी उचलून बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी प्रक्रिया करून शुद्ध पाणी पुढे जलकुंभांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाते.

या एकूण प्रवासात 13 किलोमीटरच्या दोन पाइपलाइन अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या पाइपलाइन 22 वर्ष जुन्या असून गळती तसेच विविध समस्या उद्भवत असल्यामुळे शहराला विस्कळीत पाणीपुरवठा होतो. नवीन पाइपलाइनसाठी 224 कोटी रुपयांचा खर्च असल्यामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली होती. पालिकेकडे इतका निधी खर्चासाठी नसल्याने केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगामधून निधीची मागणी करण्यात आली.

केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर महापालिका या संदर्भात सर्वप्रथम योजनेसाठी सल्लागाराची नियुक्ती करेल. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रथम राज्य शासनाची मान्यता घेतली जाईल. पुढे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. 224 कोटींचा निधी हा पाच वर्षाच्या कालावधीत टप्याटप्प्याने मिळणार आहे. एक पाईपलाईन दुरुस्तीसाठी निघाल्यास दुसर्‍या पाईपद्वारे शहराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहराला विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येतून मुक्तता मिळणार आहे.

Related Stories

No stories found.