मासिक पाळी प्रकरणाला वेगळे वळण; आदिवासी आयुक्तालयाचा अहवाल समोर

बालहक्क संरक्षण आयोगाकडून अद्याप अहवाल नाही
मासिक पाळी प्रकरणाला वेगळे वळण;  आदिवासी आयुक्तालयाचा अहवाल समोर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील मासिक पाळी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीच्या हातून वृक्षारोपण करू नये झाड जगत नाही असे येथील शिक्षकाने म्हटले होते. यानंतर सबंध राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, आदिवासी आयुक्तांमार्फत या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीनंतर समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली असून विद्यार्थिनीने शिक्षकावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे समोर आले आहे...

शिक्षकाने मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपणापासून आपणास रोखल्याची तक्रार या विद्यार्थिनीने केली होती. या घटनेनंतर त्र्यंबकमधील श्रमजीवी संघटनेने आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांची भेट घेत या प्रकरणी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राज्य महिला आयोगान याबाबतची दखल घेत आदिवासी आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.

यानंतर आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी या घटनेची चौकशी केली. त्यात संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे.

यावेळी मीना यांनी शाळेचा हजेरी पट तपासत चौकशीला सुरुवात केली. ज्या दिवशी म्हणजेच १४ जुलैच्या दिवशी वृक्षारोपण झाले त्याच दिवशी ही विद्यार्थिनी शाळेत गैरहजर असल्याचे समोर आले. ती विद्यार्थिनी जून महिन्यात चार दिवस तर जुलै महिन्यात फक्त तीन दिवस शाळेत हजर असल्याचे समोर आले आहे.

सतत गैरहजर असल्यामुळे तिचे बारावीचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. म्हणून तिच्या वर्गशिक्षकांनी तिला विज्ञान शाखेत शिकत असूनही गैरहजर असल्याने तिला जाब विचारला होता. तसेच यापुढे शाळेत बसू न देण्याचाही इशारादेखील दिला होता. त्यामुळे या विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीमुळे आपल्याला वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच विद्यार्थिनी आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्ष संघटनेची सदस्यदेखील असल्याचे समोर येत आहे.

मुलगी गैरहजर नव्हती तर ती शाळेत उशिराने येत होती. त्यामुळे तिची गैरहजेरी लागत होती. मुलीच्या पाठीमागे महिला आयोग खंबीरपणे उभे राहणार आहे. लवकरच आयोगाची बैठक होणार आहे. त्यामध्ये येथील चौकशीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर महिला आयोग भूमिका मांडेल.

सायली पालखेडकर, बालहक्क संरक्षण आयोग, सदस्या नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com