कांद्याला काय दर मिळावा हा उत्पादकांचा निर्णय

कांद्याला काय दर मिळावा हा उत्पादकांचा निर्णय

कांद्याचे दर ठरविण्याचे काम कांदा उत्पादक शेतकरी करणार- भारत दिघोळे

नाशिक । प्रतिनिधी

कांद्याला काय भाव मिळावा, हा विचार कांदा उत्पादक म्हणून करण्याऐवजी कांदा काय दराने विकला जावा हा विचार करण्याची आज खर्‍या अर्थाने गरज आहे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

'आपला कांदा आपलाच भाव ’ या मोहिमेअंतर्गत कांद्याचे दर ठरविण्याचे काम आपण कांदा उत्पादक शेतकरी करणार असल्याचा विश्वासही दिघोळे यांनी शेतकर्‍यांना दिला आहे. त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका ही की कांद्याला किती दर मिळावा हा अधिकार पुर्णपणे कांदा उत्पादकांचा आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे कष्ट, कांद्याचे पीक पिकवतांना येणारा खर्च, जमिनीची किंमत, लाईट बील, मजुरी, खते, औषधे, बियाणे याचबरोबर कांदा उत्पादकांचे कांदा पिकवण्याचे कसब आहे.देशाला कांदा पुरवण्याची आपली किंमत,जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्रीयन कांद्याची चव व टिकवन क्षमता याची किंमत.केवळ एका कांदा पिकातून देशातील लाखो लोकांना मिळणार्‍या रोजगाराची किंमत.आपल्या देशाला परकीय चलन मिळवून देण्याची कांद्याची असलेली क्षमता त्याची किंमत , या सर्व गोष्टींचा विचार करता कांद्याला काय दर मिळावा, हा विचार आपण कांदा उत्पादक म्हणून करण्याऐवजी आपण कांदा काय दराने विकावा हा विचार करण्याची खर्‍या अर्थाने आज गरज आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका अशी आहे की,कांदा हा कमीत कमी 30 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त व पुढे 50 रुपये 100 रुपये 150 रुपये 200 रुपये असा कितीही दराने विकत असला तरी तरी तो आपला कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा अधिकार आहे. आपल्या मालाची किंमत आपणच ठरवली पाहिजे . त्याला कोणाचाही विरोध असण्याचे काही कारण नाही.ज्यांचा ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे, त्यांनी कांदा स्वतः पिकवून स्वतःची सोय करून घ्यावी,असेही दिघोळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यातील, देशातील कुठल्याही राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना इतर कुठल्याही घटकांना बांधील नसल्याने कांदा उत्पादकांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र काम करत आहे.आपण सर्व कांदा उत्पादकांनी आपल्याच कांदा पिकाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असून आपला कांदा आपलाच भाव मोहिमेअंतर्गत कांद्याचे दर ठरविण्याचे काम आपण कांदा उत्पादक शेतकरीच करणार आहोत,असा विश्वासही कांदा उत्पादक बांधवांना भारत दिघोळे यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com