नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणारे प्रदुषीत पाणी व नाल्यातून येणारे गटारीचे सांडपाणी यामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदुषण थांबविण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीच्यावतीने प्रायोगिक तत्वावर तपोवनातील एसटीपी व रामवाडी नाला याठिकाणी ओझोनेशनद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान गोदा प्रदुषणासंदर्भात नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने टोल फ्रि हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार नुकतीच गोदावरी प्रदुषण मुक्तीसंदर्भात व प्रदुषणमुक्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या महानगरपालिका स्तरावरील उपसमितीची बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली आहे. यात गोदावरी नदीतील प्रदुषण कमी करण्यासाठी मलनिस्स:रण केंद्रातून बाहेर पडणार्या पाण्याचा बीओडी कमी करण्यासाठी नागपूर येथील ओझोन रिसर्च अॅण्ड अॅप्लीकेशन प्रा. लिमीटेड या खासगी कंपनीने कामाचे सादरीकरण केले होते.

एसटीपीतून बाहेर पडणार्या प्रक्रियायुक्त मलजलावर ओझोनची प्रक्रिया करुन अतिरीक्त शुध्दीकरण केले जाणार आहे. यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मानांकनाप्रमाणे प्रकिया केली जाणार आहे. याकरिता ओझोनेशन टेक्नॉलॉजी वापरुन बीओडी कमी केला जाणार आहे. याच प्रक्रियेद्वारे प्रायोगिक तत्वावर तपोवनामधील मलनिस्सारण केंद्रातून गोदावरी नदीत येऊन मिसळण्यापुर्वी आणि रामवाडी भागातून नदीत मिसळणार्या नाल्यातील सांडपाणी अशा दोन ठिकाणी ओझोनेशन प्रक्रिया केली जाणार असुन यादृष्टीने महापालिकेकडुन तयारी केली जात आहे. सुरत व वाराणसी याठिकाणी प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी ओझोनेशन टेक्नॉलॉजी वापरुन बीओडी कमी केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याचा वापर महापालिकेच्या इतर एसटीपी व नाल्यात केला जाणार आहे.

तक्रारीसाठी टोल फ्रि नंबर

नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडुन गोदा प्रदुषण मुक्तीसाठी व प्रदुषणासंदर्भात तक्रारीसाठी आता टोल फ्रि नंबर जाहीर केला आहे. यात 18002331982 आणि 7030300300 या टोल फ्रि नंबरवर नागरिकांना तक्रारी करता येणार आहे. तसेच नाशिक महापालिकेच्या ऑन लाईन ग्रीव्हन्स अॅप यावर NMC e-connect गोदावरी व उपनद्यासंदर्भात तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.