बंदी असलेल्या एसटीच्या आवारात खासगी वाहनांची मांदियाळी

बंदी असलेल्या एसटीच्या आवारात खासगी वाहनांची मांदियाळी
Published on
1 min read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एरव्ही राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या आवारात खासगी वाहने येण्यासाठी बंदी असते. परंतु, रात्री परिवहन मंत्र्यांनी खासगी वाहतूक एसटीच्या फलाटावरून करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज सकाळपासून नाशिकमधील बसस्थानक परिसरात खासगी वाहतूक करण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी दिसून आली....

संपावर असलेले एसटी कर्मचारी आणि खासगी वाहन चालक यांच्यात हमरी तुमरी टाळण्यासाठी अनेक बसस्थानकांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसून आला.

एसटीचे महाराष्‍ट्र शासनात विलिनीकरण करावे; या प्रमुख मागणीसह अन्‍य मागणीसाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीची चाके थांबली असून दररोज हजारो फेऱ्या नाशिकच्या रद्द झाल्या आहेत.

सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या किंवा सुट्ट्या संपल्यानंतर शहर गाठणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

दरम्यान, नाशिकच्या महामार्ग बसस्थानक, नवीन आणि जुने सीबीएस परिसरात पोलिसांनी खासगी वाहनधारकांना प्रवेश न देता बसस्थानकाच्या बाहेरूनच वाहतूक करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यामुळे महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या महामार्ग बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट होता तर बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला मोठी खासगी वाहनांची गर्दी दिसून आली.

खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता मिळाल्यामुळे अनेक संस्थांची वाहने सध्या प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com