<p><strong>नाशिक । Nashik</strong></p><p> आधुनिक वैद्यकातील 58 शस्त्रक्रिया बीएएमएस झालेल्या आयुर्वेद पदवीधरांच्या शिक्षणात अंर्तभूत करण्याचा निर्णय सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या आर्युवेद शिक्षणाचे नियमन करणार्या संस्थेन घेतला आहे. यास इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र विरोध दर्शवला असून शुक्रवारी (दि.11 डिसेंबर) दिवसभर दवाखाने बंद ठेवून निषेध नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे याचा वैद्यकीय सेवेवर मोठा परिणात होण्याची शक्यता आहे.</p><p>20 नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेने आधुनिक वैद्यकातील 58 शस्त्रक्रिया बीएएमएस झालेल्या आयुर्वेद पदवीधरांना त्यांच्या पदव्यूत्तर शिक्षणामध्ये अंर्तभूत केल्या आहेत. याकरीता नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यक असतानाही ती घेतलेली नाही. या पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर त्यांना एमएस (मास्टर ऑफ सर्जरी) ही आधुनिक वैद्यक शास्त्रातील पदवी दिली जाणार आहे. जे रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकते अशी भीती आयएमए नाशिकच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे. या आर्युवेदिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यानंतर एकच विद्यार्थी दातांची, डोळ्यांची, नाक कान घशाची, पोटाची, आतड्यांची, पित्ताशयाची, मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करू शकणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या प्राणाशी खेळ असल्याची भीती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत सर्व दवाखाने, क्लिनिक्स, बाह्य रुग्ण विभाग बंद ठेऊन निषेध नोंदविणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. याचा मोठा परिणाम संपुर्ण आरोग्य सेवांवर होणार आहे.</p>