कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य : पोलीस आयुक्त पांडे

कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य : पोलीस आयुक्त पांडे

पंचवटी। वार्ताहर Nashik

शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली आहे. प्रत्येक विभागास दिलेली जबाबदारी त्यांनी करणे अपेक्षित आहे.

पोलीस विभागाचे काम केवळ महसूल जमा करणे नसून कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राखणे प्राथमिक जबाबदारी असल्याने यास प्राधान्य दिले जाईल. तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांना काम करताना आवश्यक असल्यास त्या विभागांना पोलीस बळ देण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी संयुक्त मोहीम राबविण्यात येईल, असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीत सांगितले.

शनिवारी पंचवटी पोलीस ठाण्यात आयुक्त पांडे यांनी भेट देत अधिकारी आणि सेवकांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पदाधिकार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर मार्गदर्शन करताना सांगितले की, नियोजनबद्ध काम केल्यास चांगला निकाल मिळतो.शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस विभागाचे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे. केवळ वाहन धारकावर केसेस करून महसूल जमा करणे ही दुय्यम कामगिरी आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे ट्रॅफिक पोलिसांचे खरे काम आहे. यापुढे नाकाबंदी दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने वाहनांची कागदपत्रे न तपासता संशयित व्यक्तीची व वाहनांची झडती घेऊन त्यांच्याकडे घातक शस्त्र आहे का याची खात्री केली जाईल व ही तपासणी केवळ एक मिनिटात पूर्ण होईल.

आगामी काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानासमोर गर्दी करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे यांच्यावर कारवाई करून केसेस थेट कोर्टात पाठविल्या जातील. यावेळी उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, पद्माकर पाटील, डॉ. दिनेश बच्छाव, महंत भक्तीचरणदास महाराज, नगरसेविका पूनम मोगरे, नगरसेवक मच्छिंद्र सानप, कविता कर्डक, पांडुरंग बोडके, डॉ. मनीषा रौदळ, गुलाब भोये, सचिन ढिकले, नरेश पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

चौक्यांमध्ये मूलभूत सुविधांची गरज

पोलिसांना काम करताना कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे पाणी आणि शौचालयाची ज्या चौकीत सुविधा नाही, अशा चौक्या बंद केल्या जाणार आहे. या चौक्यांचे कामकाज पोलीस ठाण्यातून सेवक करतील. बेईज्जत होऊन काम करण्यापेक्षा न करणे कधीही चांगले. त्यामुळे यापुढे पोलीस ठाणे अंतर्गत चौकीसाठी हक्काची जागा आणि त्यात मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com