
नाशिक । प्रतिनिधी
जे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी दि.३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत,त्यांनी एक जुलैच्या काल्पनिक वेतन वाढीसाठी पेन्शनच्या प्रक्रियेप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावे,असे आवाहन सुभाष टिळक यांनी केले आहे.
सोमवारी (दि.१७) जिल्ह्यातील सर्व तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेले शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नाशिक येथील एनडीएसटी सोसायटी,नाशिक येथे शिवाजी निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ताडगे यांनी सांगितले की, आपण पूर्वी पेन्शनचा प्रस्ताव सादर केला,त्याप्रमाणेच आपल्या कार्यालयातून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक विभागाकडे तीन प्रतीत सादर करावा,असे आवाहन केले. चर्चेत धोंडीबा डोंगरे, रामदास खैरनार, एकनाथ बिरारी आदींनी भाग घेतला.
यानंतर सदर वेतन वाढीचे प्रस्ताव स्वीकारावे, अशा प्रकारचे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्वाक्षरीचे लेखी निवेदन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व प्राथमिक विभागाचे शिक्षण सहाय्यक रवींद्र आंधळे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी बैठकीला विठ्ठल खैरनार,भरत पवार, बाळासाहेब बागुल, दत्तात्रेय दराडे, शंकर बिरारी, दिनकर सादवे, पांडुरंग सांगळे, अंजली ठोके, उत्तम सोनवणे आदींसह जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.