प्राथमिक शिक्षक संघटनेचा आंदोलनचा इशारा

प्राथमिक शिक्षक संघटनेचा आंदोलनचा इशारा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदल्या ( Transfers )2022 अंतर्गत अवघड क्षेत्र निश्चित करताना प्रशासनाने दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांवर व शाळांवर अन्याय केलेला असून फक्त दहा गावांचा समावेश अवघड क्षेत्र यादीत केल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन अवघड क्षेत्र यादीवर आक्षेप नोंदवला आहे. यात दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करताना गावांची वर्गवारी अवघड क्षेत्र व सोप्या क्षेत्रात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले होते मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका निहाय तालुकास्तरावर समिती नेमून शासन निर्णयात दिलेल्या निकषांची पूर्तता करणार्‍या गावांचा समावेश अवघड क्षेत्र यादीत करणे संदर्भात सूचित केले होते. पेसा क्षेत्रात गाव समाविष्ट आहे काय ?, परिवहन सुविधा / बस सेवा उपलब्ध आहे काय ? , वन्यप्राणी हिंस्र प्राण्यांचा संचार आहे काय?,

पर्जन्यमान वार्षिक 2000 मिलिमीटर पेक्षा अधिक आहे काय?, संवाद छायेचा प्रदेश / संदेशवहन सुविधा उपलब्ध आहे काय?, डोंगरी क्षेत्र आहे काय?, राष्ट्रीय / राज्य महामार्गापासून दहा किमी पेक्षा जास्त दूर आहे का? या सात पैकी तीन निकष पूर्ण करणार्‍या गावांचा समावेश अवघड यादीत होणे आवश्यक होते मात्र प्रशासनाने तसे केलेले नाही. त्यामुळे निकषात बसत असुनही अनेक गावांवर अन्याय झालेला आहे. खरोखर अवघड क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांना याचा फटका बसणार आहे व वर्षानुवर्षे त्यांना अवघड क्षेत्रातच काम करावे लागणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द, पिंपरखेड, ब्रम्ह्याचा पाडा, करंजाळी पाडा, वणी खुर्द, जोरण, पिंपळगाव धूम, उपीळपाडा, खेडले. याउलट गांडोळे, ननाशी, पिंपळपाडा, कोचरगाव या गावांच्या पंचक्रोशीतील अनेक छोटी मोठी गावे अवघड आहे.

याबाबत दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप व हरकती नोंदवून अवघड क्षेत्राचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केलेली आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे समन्वय समिती पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com