
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
मृग नक्षत्रास प्रारंभ होताच शहर परिसरात आज दुपारी अर्धा ते पाऊण तास वादळासह झालेल्या पावसाने तीव्र तापमानाच्या असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना दिलासा मिळाला. अकस्मात आलेल्या या पावसाने नागरीकांची एकच त्रेधातिरपीट उडाली होती.
वादळासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह वसाहतीतील सखल भागात पाणी साचले गेले. वादळीवार्यामुळे होर्डींगसह पत्रे उडण्याचे प्रकार देखील अनेक भागात घडले. सटाणानाका भागात उडालेल्या पत्र्याने एक इसम गंभीररित्या जखमी झाला. 42 ते 43 अंशावर स्थिरावलेल्या तापमानामुळे शहरवासिय अक्षरश: होरपळून निघाले होते. रात्री देखील उन्हाळी झळा जाणवत असल्याने तसेच वारंवार खंडीत होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरीक असह्य उकाड्याने त्रस्त झाले होते.
यंदा अपेक्षित रोहिणी नक्षत्रात न बरसल्याने हवालदिल झालेल्या नागरीकांचे आजपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राकडे लक्ष लागले असतांना दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होवून 5 वाजेच्या सुमारास वादळीवार्यांसह मृगाच्या सरी कोसळण्यास प्रारंभ झाला. तब्बल अर्धा ते पाऊण तास कोसळत असलेल्या या वादळी पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले गेले.
वादळीवार्यासह पावसाचा वेग असल्याने रस्त्यावर वाहन चालविणे देखील चालकांना कठीण झाले होते. वादळामुळे अनेक भागातील होर्डींगची नासधूस होवून घर व दुकानावरील पत्रे उडाले होते.