नाशिक । प्रतिनिधी Nashik

वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केल्यामुळे धरणांमध्ये डिसेंबर अखेर मुबलक पाणीसाठा असून दुष्काळाचे चटके यंदा जाणावणार नाही . मात्र, मार्च ते मे या महिन्यात दुष्काळी भागात पाणी टंचाई उदभवू शकते.

ते बघता जिल्हा प्रशासनाने सन २०२१ - २२ या वर्षासाठी ११ कोटी १९ लाख रुपयांच्या पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यामाध्यमातून नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे व टॅकरने गाव वस्तीत पाणीपुरवठा यासाठी ही आर्थिक तरतूद केली आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यात प्रामुख्याने चार महिन्यात झालेला पाऊस, भुजल साठा व धरणातील पाणीसाठा या बाबींचा अभ्यास केला जातो. यंदा जिल्हा परिषदेने दुष्काळी उपाय योजना व इतर आवश्यक बाबीसाठी ११ कोटी १९ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून तो मान्यतेसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठवला आहे.

यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस झाला. डिसेंबर अखेर जिल्ह्यातील २४ धरणांत ९० टक्क्याहून अधिक जलसाठा आहे. चांगल्या पावसामुळे भुगर्भातील जलसाठा एक टक्याने वाढला आहे. हे सर्व चित्र दिलासादायक असून यंदा दुष्काळाचे तीव्र चटके जाणावणार नाही. मात्र, जो नेहमीचा दुष्काळी भाग हे तेथे पाणी टंचाई जाणवण्याचि चिन्हे आहे. या ठिकाणी गाव वस्त्यांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा, विहीर अधिग्रहण या उपाय योजना राबव्यावा लागतील. ते बघता जिल्हाप्रशासनाने त्यासाठी ११ कोटी निधीची तरतूद केली आहे. जेणेकरून मार्च ते मे या कालावधीत पाणी टंचाई जाणवणार नाही.

गतवर्षी जिल्ह्यासाठी २२ कोटींचा टंचाई कृती आराखडा होता. यंदा समाधानकारक पाऊस व जलसाठा यामुळे आराखडाच्या निधी ५० टक्के कमी झाला आहे. जिल्हा प्रशासन करोनाशी दोन हात करत असले तरी दुष्काळी भागात पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी काम करत आहे.

टंचाई कृती आराखडा (रक्कम लाखात)

विंधन विहिरी घेणे - १२२

नळ योजना दुरुस्ती - ९८

तात्पुरती पुरक नळयोजना - ४९

विंधन विहीर दुरुस्ती - ०.०८

विहीर खोल करणे - ३५

बुडकी घेणे - ०.२०

खासगी विहीरी अधिग्रहण - १६३.४४

टॅकरने पाणीपुरवठा - ६५२.०५

एकूण - ११ कोटी १९ लाख