माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्यासाठी इच्छुक गुढग्याला बाशिंग बांधून तयार
जिल्हा परिषद

माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्यासाठी इच्छुक गुढग्याला बाशिंग बांधून तयार

नाशिक | Nashik

माध्यमिक शिक्षणाधिकारी (Higher Education Officer) लाच प्रकरणात अडकल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद लवकरच रिक्त होणार हे निश्चित आहे. मात्र,तत्पूर्वीच या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहे.यासाठी त्यांनी संबंधितांचे उंबरे झिजवायलाही सुरुवात केली आहे.

कळवण तालुक्यातील (Kalyan Taluka) एका शिक्षण संस्थेला 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर (Dr.Vaishali Zankar Veer) यांच्या निलंबनाची कारवाई आता अंतिम टप्प्यात आहे. ही जागा आपल्यालाच कशी मिळेल यासाठी तीन इच्छुकांनी वेगवेगळ्या माध्यमातून ‘फिल्डिंग’ लावल्याचे वृत्त आहे.

मालेगाव तालुक्यातील (Malegoan Taluka) प्रोग्रेसिव्ह शाळेला नियमबाह्य मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांची चौकशी सुरु आहे. या चौकशी समितीमध्ये नंदुरबार (Nandurbar) येथील शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम (Education Officer Machhindra Kadam) यांचे नाव आहे. आता हेच मच्छिंद्र कदम नाशिकला माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्यासाठी इच्छुक आहेत.

स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी हे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. वैशाली वीर यांनी नाशिकच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेताच प्राथमिक शिक्षणाधिकारी ते माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर पोहचल्या. त्यांच्या या कृतीविषयी नेत्यांमध्ये नाराजी असल्याची कुजबुज सद्या जोरात आहे. त्यामुळे ही ' उणीव ' पूर्ण करुनच शिक्षणाधिकारी व्हायचे, या उद्देशाने आत्तापासून इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.

नाशिकला प्राथमिक शिक्षणाधिकारी राहिलेले प्रवीण अहिरे हे सध्या ठाण्याला निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून अडगळीत पडले आहेत. त्यांना नाशिक जिल्ह्याची माहिती असल्यामुळे शिक्षण विभागाच्या (Education Department) मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरु असल्याचे कळते. नाशिक महापालिकेत शिक्षण प्रशासन अधिकारी अर्थात शिक्षणाधिकारी राहिलेले देविदास महाजन यांनाही पुन्हा नाशिकमध्ये परतण्याचे वेध लागले असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्यासाठी त्यांचेही जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे.

डॉ.वैशाली वीर या माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्यासोबत देविदास महाजन हे देखील ‘रेस’मध्ये होते. मात्र, महाजन मागे पडले आणि ‘वीर’ यशस्वी झाल्या. जवळपास दोन वर्षांपासूनची अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी महाजनही आता पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर यांच्या कारनाम्यामुळे शिक्षण विभागासह नाशिक जिल्ह्याची सर्वदूर बदनामी झाली. त्यामुळे नाशिककरांची मान शरमेने झुकली आहे. यापुढे कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी नियुक्त करावा लागेल. तरच शिक्षण विभागाची पर्यायाने जिल्ह्याचा मान राखला जाईल.

यापूर्वी निलंबित झालेले किंवा कारवाई होऊन बाहेर पडलेल्या अधिकार्‍यांची फेरनियुक्ती झाल्यास शिक्षण विभागाविषयी नकारात्मकता वाढेल. माध्यमिक शिक्षणाधिकारी नियुक्त करताना शिक्षण आयुक्त व मंत्र्यांना याचा विचार करावाच लागेल. त्यामुळे नियुक्ती करताना ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. एकूणच परिस्थितीचा विचार करता ' डाग ' लागलेला अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी नको, अशी मागणी होऊ लागली आहे.

संशयित आरोपी डॉ वैशाली झनकर यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवस सुनावणी पुढे ढकलल्यामुळे डॉ झनकरचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ झनकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

यानंतर त्यांची रवानगी थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि १८) रोजी सुनावणी होणार होती; मात्र, वकील गैरहजर राहिल्याने जामिन अर्जाची सुनावणी आज रोजी होणार होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com