पंचवटी | Panchavati

पंचवटी परिसरात शिवजयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून,सर्व परिसर भगवामय करण्यात आला आहे . पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ६५ फूट देखाव्याची उभारणी देखील अंतिम टप्प्यात आली आहे.

या भव्य देखाव्याची गिनीज बुकात नोंद केली जाणार असल्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे . १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पंचवटी परिसरात मालेगाव स्टँड मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवरायांचा १६ फूट अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येणार असून पुतळ्याच्या मागे उभारण्यात येणाऱ्या फलकावर शक्ती-भक्तीस्वरूप असलेल्या तुकाराम महाराज, वारकरी, धारकरी मावळे यांचे भव्य असे ४० बाय ६० फुटांचा फलक उभारण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना भेटून जात असल्याचा भाव यातून दिसणार आहे . मंडळाच्या वतीने परिसरात भगव्या कमानी उभ्या करून त्यावर भगवे झेंडे लावून परिसर भगवा करण्यात आला आहे . मालेगाव स्टॅण्ड परिसरात असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याच्या अवती भोवती आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

तसेच,पंचवटी कारंजा येथे पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जवळपास ६५ फूट उंच किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून यासाठी लाकडाच्या बल्ल्या,लोखंडी प्लेट आणि फायबरचा उपयोग करण्यात येत आहे . यापूर्वी ६५ फूट उंच,४५ फूट रुंद असा शिवजयंती साठी भव्य असा देखावा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

विशेष म्हणजे किल्ल्याच्या वर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला असून शिवप्रेमी आणि नागरिकांना या पुतळ्यापर्यंत जाऊन महाराजांचे दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे .

कोविडचा वाढता प्राधुर्भाव लक्षात घेता शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे . मिरवणूक काढण्याऐवजी पंचवटी कारंजा परिसरात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

- मामा राजवाडे, अध्यक्ष पंचवटी शिवजन्मोत्सव समिती