बारागाड्या यात्रेची तयारी गतिमान

बारागाड्या यात्रेची तयारी गतिमान

सातपूर । प्रतिनिधी

गेल्या 150 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या सातपूर गावात भवानी मातेचा यात्रोत्सव ( Bhavani Mata Yatrostav )गुढीपाडव्याच्या ( Gudhipadava )दिवशी बारागाड्या ( Baragadya) ओढून साजरा केला जातो. दोन वर्षे करोनामुळे यात्रा रद्द करावी लागली होती. यंदाच्या वर्षी अतिशय उत्साहात यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार असून त्यादृष्टीने तयारी गतिमान करण्यात आली आहे.

भवानी माता यात्रोत्सवाच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लक्ष्मण घाटोळ, उपाध्यक्षपदी त्र्यंबक भदूरे, कार्याध्यक्षपदी सागर निगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारागाड्या ओढणार्‍या ‘गणेशा’चा मान यावर्षी किरण निगळ या युवकास देण्यात आला. दरम्यान यंदाच्या यात्रोत्सवाची तयारी गतिमान करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर लाकडी बॅरेकेटींग लावण्यात आलेले आहे. बारागाड्यांची देखभाल दूरुस्ती करण्यात आलेली आहे.

भवानी मंदिरात सापडलेल्या पुरातन दगडी मुखवट्याची विधीवत स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे. यंदा कुस्त्यांची दंगल औद्योगिक क्षेत्रातील भवानी माता मंदिरालगतच घेण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हाभरातील पहिलवानांना बोलावण्यात आले आहे. यंदा फायर शो व लेसर शो चे आयोजन करण्यात येणार असल्याचे उत्सव समीती अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी सांगितले.

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या वर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे उत्सवाकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे आ. सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे आदी मान्यवरांची या उत्सवाला खास उपस्थिती राहणार आहेत.

पोलीस आयुक्तालयात शांतता समित्या, मोहल्ला कमिटीच्या बैठक घेण्यात आली. यावेळी या बारागाड्यांमध्ये कोणालाही बसू न देण्याचा निर्णय गेण्यात आला. यावेळी सातपूर जत्रा उत्सव समितीचे सदस्य शांताराम निगळ, राजाराम पाराजी निगळ , गोकुळ नामदेव निगळ, प्रकाश निगळ, विजय भंदूरे, सचिन घाटोळ, शशिकांत घाटोळ, गणेश निगळ, भिवानंद काळे, अनिल मौले, सुरेश भंदूरे, रवी काळे, बजरंग शिंदे, अरुण काळे, अ‍ॅड कपिल निगळ आदींसह सातपूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

वाहतूक मार्गात बदल

यात्रोत्सवाच्या बारागाड्या ओढण्यासाठी व हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरीक त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्यावर गर्दी करुन असतात.त्यामुळे त्र्यंबकेश्वर कडून येणारी वाहतूक महिंद्र सर्कल पासून तर नाशिकहुन सातपूरला येणारी वाहतूक सकाळ चौफूलीवरुन उद्योग क्षेत्राच्या मार्गे वळवण्यात येणार आहे.

महिंद्र चौफुलीवर उभारणार प्रतिकृती

सातपूर गावची परंपरा असलेल्या बारागाड्यांची प्रतिकृती महिंद्र सर्कलवरील एका चौकोनात उभारण्यात येणार आहे. गणेशा व गाडीची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.